Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग

ठाणे महापालिकेच्या महापौरपदी अनपेक्षितपणे कोपरी येथील शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडून स्थायी समिती, सभागृह नेते तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्येही नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेत एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौरपदी अनपेक्षितपणे कोपरी येथील शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडून स्थायी समिती, सभागृह नेते तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्येही नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेत एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे स्थायी समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या, स्वीकृत सदस्य आणि शिक्षण मंडळासाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेला ७५, भाजपला २८, राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ९, एमआयएम ५, उद्धव सेना १ आणि अपक्ष १ असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. अपेक्षेप्रमाणे शिंदेसेनेने पुन्हा एकदा पालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदासाठी अनुसूचित जातीतील सात जणांची नावे चर्चेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना धक्का देत कोपरीतील शर्मिला पिंपळोलकर यांना संधी दिली. हे पद सव्वा वर्षांसाठी असले तरी त्यानंतर पुन्हा नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची माहितीही पुढे येत आहे. महापौरपदानंतर आता स्थायी समिती, सभागृह नेते, शिक्षण मंडळ, स्वीकृत सदस्य आदी पदांवरही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही वर्षांत महापालिकेतील विविध समित्यांमध्ये तेच तेच चेहरे दिसत होते. मात्र स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शिकवणुकीनुसार एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक राजकीय धक्के देण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. त्यानुसार सभागृह नेतेपदासाठीही नवीन चेहरा पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समितीतही नवे चेहरे?

स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आली असली तरी शिंदे नेमका कोणावर विश्वास टाकणार? याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तसेच स्वीकृत सदस्यपदांसाठीही काही नवीन चेहरे प्रथमच पालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. ज्यांना नगरसेवक म्हणून संधी मिळाली नाही, अशांचे पुनर्वसन परिवहन समिती किंवा वृक्ष प्राधिकरण समितीत केले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

भाजपच्या नगरसेवकांना टप्प्याटप्प्याने संधी

भाजपमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी सुमारे ४० जणांची नावे चर्चेत असली, तरी त्यापैकी दोन नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. स्थायी समिती व इतर समित्यांमध्येही भाजप आपल्या नगरसेवकांना टप्प्याटप्प्याने संधी देणार असून प्रत्येक नगरसेवकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने आखल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in