Thane : स्थायी, विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर; सणासुदीच्या दिवसांमुळे गटनेत्यांनी केली मागणी

येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती व विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार होती. परंतु एका दिवसात विशेष सभेची तारीख पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.
Thane : स्थायी, विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर; सणासुदीच्या दिवसांमुळे गटनेत्यांनी केली मागणी
Published on

ठाणे : येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती व विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार होती. परंतु एका दिवसात विशेष सभेची तारीख पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. रमझानचा महिना आणि होळीचे दिवस असल्याने सर्व पक्षीय गटनेत्यांनी महापौरांकडे केलेल्या मागणीनंतर ही सभा आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि प्रशासनाचीदेखील कानउघाडणी केल्याचे समजते.

महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तसेच पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतलेल्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर परिवहन समिती व विशेष समित्यांमध्ये स्थान मिळावे, यासाठी इच्छूक नगरसेवकांनी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. पक्षासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत नेत्यांची मने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता, विविध समित्यांतील पदवाटपाचे गणित जवळपास निश्चित मानले जात आहे. स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड अपेक्षित असून बहुमताच्या आधारे शिंदे सेनेला सर्वाधिक प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजप, राष्ट्रवादी (शप व अप) आणि एमआयएमलाही प्रतिनिधीत्व दिले जाणार असल्याचे संकेत आहेत.

असे निवडले जाणार सदस्य

शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, क्रीडा-समाजकल्याण व सांस्कृतिक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन अशा पाच विशेष समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. हे सर्व सदस्य नगरसेवकांमधूनच निवडले जाणार आहेत. परिवहन समितीत एकूण १३ सदस्य असतील, त्यापैकी एक पदसिद्ध तर उर्वरित १२ सदस्यांची निवड सभेत होणार आहे. परिवहन समितीला आर्थिक व प्रशासकीय महत्त्व असल्याने या समितीवर स्थान मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे.

मग महासभा लावण्याची घाई का केली?

पुढील महिन्यात पहिला आठवडा हा होळी सणाचा असल्याने तसेच रमझानचा महिना असल्याने काही नगरसेवकांचे आधीच दौरे निश्चित झाले होते. त्यामुळे ५ तारीख पुढे ढकलण्याची विनंती महापौरांकडे करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार विशेष महासभा पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, आधीच महासभा लावण्याची घाई का केली, आधी तुम्हाला माहीत नव्हते का, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

अर्जच उपलब्ध नाहीत

स्वीकृत नगरसेवक व परिवहन समिती सदस्यपदासाठी अर्ज वितरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मात्र, अनेक इच्छूक अर्ज घेण्यासाठी मुख्यालयात गेले असता अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in