Thane: पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन; उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर कारवाई

नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने तीन अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांचा निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.
Thane: पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन; उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर कारवाई
Thane: पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन; उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर कारवाई(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

ठाणे : नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने तीन अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांचा निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. मासुंदा तलाव येथील दत्त मंदिर घाटावरील विसर्जन व्यवस्थेतील त्रुटींवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेतर्फे २० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्त मासुंदा तलाव येथील दत्त मंदिर घाट आणि अहिल्यादेवी घाटावर देवीमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील दत्त मंदिर घाटावरील विसर्जन व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित पाचही अधिकाऱ्यांची १५ ऑक्टोबर रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जन घाटावरील संपूर्ण नियोजन, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजनांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

मात्र, विसर्जनाच्या दिवशी संबंधित अधिकारी किंवा त्यांच्या अधिनस्त अधिकारी घाटावर उपस्थित नसल्याचे महापालिकेच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. असे असतानाही कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

मासुंदा तलाव येथील विसर्जन व्यवस्थेतील नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त-१ प्रशांत रोडे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in