

ठाणे : संभाव्य पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू केली आहे. शहरातील एसटीपी प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, विहिरींचे पुनर्जीवन आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरावर विशेष भर दिला जात असून नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबवल्या जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
शुक्रवारी झालेल्या महासभेत शिंदे गटाचे नगरसेवक राजेश मोरे यांनी हवामान बदलाचा परिणाम या विषयावर लक्षवेधी मांडली होती. यावेळी त्यांनी एसटीपी प्रकल्पांची कार्यक्षमता, पाणीगळती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले. विकासकांकडून उभारलेले एसटीपी प्रकल्प प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध भागांत शेड उभारण्यात आले असून नागरिकांसाठी ५० पाणीपोई सुरू करण्यात आल्या आहेत. एसटीपी प्रकल्पांद्वारे पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने, बांधकामे आणि इतर आवश्यक ठिकाणी केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील ६५ ठिकाणांपैकी ३५ ठिकाणी आरओ प्रकल्प कार्यरत असून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सखल भागांतही उपाययोजना करण्यात येत आहेत. एसटीपी प्रकल्पांचे स्वतंत्र ऑडिट करून अहवाल सादर केला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेकडून वाढीव पाणीपुरवठा मिळणार असल्याने शहरातील पाणीस्थिती सुधारेल, असा विश्वास व्यक्त करत महापालिका पाणी व्यवस्थापनात कुठेही कमी पडणार नाही.
सौरभ राव, आयुक्त
विहिरींच्या पुनर्जीवनासह जलसंधारणचे अभियान सुरू
ठाणे महानगरपालिकेमार्फत बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी १२ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी प्रति हजार लिटर ७.५० रुपये दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत शहरात २५११ ठिकाणी व्यवस्था बसवण्यात आली असून त्यांची प्रत्यक्ष कार्यस्थिती तपासली जाणार आहे. विहिरींचे पुनर्जीवन आणि जलसंधारण कामेही ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सुरू आहेत.