
ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वुसलीचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत १८ कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर, आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात ९६०३ नळजोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त करण्यात आले आहे. तसेच, ५४७ पंप रूम सील करण्यात आले आहेत. तर, ९९२३ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलाची रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. एकूण बिलांच्या रकमेपैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बिल वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल.
- विनोद पवार, पाणीपुरवठा अभियंता
बिल न भरल्यास पाणीपुरवठा खंडित होणार
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.