Thane : पाणी बिल थकबाकीसाठी पालिकेची मोहीम तीव्र; १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडित करणे, नोटीस देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले.

या कारवाईत दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडित करण्यात आली, २१ पंप जप्त तर ३४ पंप रूम सील करण्यात आले असून ३२४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समितीत ७० नळसंयोजने खंडित करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४ नळसंयोजने खंडित करून एकूण ६०० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मुंब्रा प्रभाग समितीत २३६ नळसंयोजने खंडित, १८१ पंप जप्त करून ४१ पंप सील करण्यात आले असून ३७३६ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५ नळसंयोजने खंडित करून ३७० जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१ नळसंयोजने खंडित करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समितीत ४ नळसंयोजने खंडित करून २६ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तर वागळे प्रभाग समितीमध्ये १ नळसंयोजन खंडित करण्यात आले आहे. एकूण १०७४ नळसंयोजन खंडित करण्यात आली. तर २०२ पंप जप्त, ७५ पंप रूम सील करण्यात आले असून एकूण ५०५६ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून १७,८९,५५९ इतकी वसुली करण्यात आली.

थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in