ठाणे महापालिकेत ‘महिलाराज’; ६६ महिलांना आरक्षणाचा लाभ, ३३ प्रभागांची रचना निश्चित

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून आरक्षण सोडतीनंतर शहरात महिलांचे राज्य येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सोडतीनुसार ठाणे महापालिकेत ६६ महिला नगरसेवक, तर ६५ पुरुष नगरसेवक निवडून येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक राहणार आहे.
ठाणे महापालिकेत ‘महिलाराज’; ६६ महिलांना आरक्षणाचा लाभ, ३३ प्रभागांची रचना निश्चित
Published on

अतुल जाधव/ ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून आरक्षण सोडतीनंतर शहरात महिलांचे राज्य येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सोडतीनुसार ठाणे महापालिकेत ६६ महिला नगरसेवक, तर ६५ पुरुष नगरसेवक निवडून येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक राहणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. या वेळी ठाणे महापालिकेच्या टेंभी नाका येथील शाळा क्र. ७ मधील आठवीतील विद्यार्थिनी पियू गौर आणि अवंशिता प्रजापती यांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.

२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्राची एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी नोंदली गेली आहे. यापैकी अनुसूचित जाती- १,२६,००३, तर अनुसूचित जमाती- ४२,६९८ इतकी लोकसंख्या आहे. या लोकसंख्या आकडेवारीच्या आधारे ठाणे महानगरपालिकेने ३३ प्रभागांची रचना निश्चित केली आहे.

या प्रभागांपैकी ३२ प्रभाग- प्रत्येकी ४ सदस्य, १ प्रभाग- ३ सदस्य असे मिळून एकूण १३१ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. १३१ पैकी ६६ जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकसंख्या आणि प्रवर्गनिहाय निकषांच्या आधारे निवडणूक विभागाने आरक्षण निश्चित केले आहे. आरक्षण सोडतीनंतर ६६ महिला आणि ६५ पुरुष असे प्रमाण राहणार असल्याने या निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत महिलांचे प्रतिनिधित्व सर्वाधिक वाढेल. काही महिला उमेदवारांना आरक्षणाचा धक्का बसला असला तरी त्यांनी सहाय्यक वॉर्ड किंवा शेजारील प्रभागांत तयारी केलेली असल्याचेही दिसले.

१७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी संधी

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार, मीरा-भाईंदर २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. बहुतेक ठिकाणी महिलांसाठी ५०%च्या आसपास/वरील आरक्षण निश्चित झाल्याने महिला उमेदवारांसाठी मोठी खिडकी उघडली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आरक्षणाच्या प्रारूपावर हरकती-सूचना १७ ते २४नोव्हेंबर या कालावधीत प्रत्यक्ष सादर करता येणार आहेत.

सोडतीला महिलांची अल्प उपस्थिती

महिलांना ६६ जागांची मोठी संधी मिळाल्याने सर्वसाधारण उत्साह असणे अपेक्षित होते; मात्र सोडतीच्या वेळी गडकरी रंगायतनात महिलांची उपस्थिती अत्यंत कमी दिसून आली.

महायुतीचा नारा

सोडतीच्या वेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ‘महायुती’ मजबूत करण्याचा संदेश दिल्याचे दिसून आले.

प्रवर्गनिहाय एकूण आरक्षण

  • अनुसूचित जाती - ९ जागा

  • अनुसूचित जमाती - ३ जागा

  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) - ३५ जागा

  • सर्वसाधारण - ८४ जागा

  • एकूण १३१ जागांपैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

  • एससी महिला - ५ जागा, एसटी महिला - २ जागा, ओबीसी महिला - १८ जागा,

  • सर्वसाधारण महिला ४१ जागा यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेत महिलांचे स्पष्ट वर्चस्व दिसून येणार आहे.

प्रभागनिहाय आरक्षण - संपूर्ण तपशील

  • अनुसूचित जाती (एससी) आरक्षण

  • प्रभाग क्रमांक : ३(अ), ६(महिला), ७(महिला), ९(अ), १५(अ), १६(अ), २२(अ), २४(अ), २८(अ) (५ प्रभाग एससी महिला)

  • अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण

  • प्रभाग क्रमांक : १(अ), २(अ-महिला), ५(अ-महिला)

  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) - महिला आरक्षण

  • प्रभाग क्रमांक : १(ब), ३(ब), ८(अ), ६(ब), ७(ब), ९(ब), १०(अ), १४(अ), १५(ब), १६(ब), १७(अ), १९(अ), २४(ब), २६(अ), २८(ब), २९(अ), ३०(ब), ३३(ब)

  • एकूण : १८ प्रभाग

  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) - सर्वसाधारण (महिला/पुरुष)

प्रभाग क्रमांक : २(ब), ४(अ), ५(ब), ११(अ), १२(अ), १३(अ), १८(अ), २०(अ), २१(अ), २२(ब), २३(अ), २५(अ), २७(अ), ३०(अ), ३१(अ), ३२(अ), ३३(अ)

एकूण : १७ प्रभाग

सर्वसाधारण (ओपन) - महिला आणि सर्वसाधारण जागा

खालील प्रभागांमध्ये (क) आणि (ड) अशा जागांसाठी खुल्या/महिला आरक्षणाचे गुणोत्तर निश्चित झाले आहे :

१(क), २(क), ४(ब)(क), ५(क), ८(ब), ९(क), १०(ब), ११(ब)(क), १२(ब)(क), १३(ब)(क), १४(ब), १५(क), १६(क), १७(ब), १८(ब)(क), १९(ब), २०(ब)(क), २१(ब)(क), २२(क), २३(ब)(क), २५(ब)(क), २६(ब), २७(ब)(क), २८(क), २९(ब), ३०(क), ३१(ब)(क), ३२(ब)(क), ३३(क)

logo
marathi.freepressjournal.in