कोणत्याही प्रकल्पांच्या घोषणांशिवाय ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६५५ कोटींनी वाढला

यावर्षीच्या अर्थसंकल्पात जुन्या किंवा नव्या अशा एकाही प्रकल्पाची घोषणा करण्यात आली नसतानाही ठाणे महापालिकेचा यावर्षीच्या अर्थसंकल्पात ६५५ कोटींची वाढ होऊन...
कोणत्याही प्रकल्पांच्या घोषणांशिवाय ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६५५ कोटींनी वाढला

ठाणे : यावर्षीही आर्थिक शिस्त कायम राखत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी २०२४-२५ चा आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. विशेष म्हणजे यावर्षीच्या अर्थसंकल्पात जुन्या किंवा नव्या अशा एकाही प्रकल्पाची घोषणा करण्यात आली नसतानाही ठाणे महापालिकेचा यावर्षीच्या अर्थसंकल्पात ६५५ कोटींची वाढ होऊन यावर्षीचा ५०२५.१ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आरोग्य व्यवस्था, महिला सक्षमीकरण, स्वच्छतेवर भर देण्याबरोबरच यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याने सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटले आहे.

यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने अपेक्षेप्रमाणेच यावर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नसून विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कामांचा दर्जा राखत सुरू असलेलेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्च ३३४५ कोटी ६६ लाख, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लाख असा एकूण ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२३ -२४ मध्ये ४३७० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात यंदा सुमारे ६५५ कोटींची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहिरात, स्थावर मालमत्ता आदी विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी देखील शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३१६० कोटी १६ लाखांऐवजी ३०९२ कोटी ३९ लाख सुधारित करण्यात आले आहे. महापालिकेने अपेक्षित केलेल्या ४६० कोटी ५ लाखांच्या अनुदानात ६९७ कोटी ९८ लाख वाढ होत असून सुधारित अर्थसंकल्पात अनुदानापोटी ११५८ कोटी ३ लाख अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. तर डिसेंबर २०२३ अखेर ९८९ कोटी २९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातील अखर्चित रकमा २०२३-२४ च्या आरंभीच्या शिलकेमध्ये समाविष्ट आहेत. खर्चात २०२३-२४ मध्ये महसुली खर्च २७०८ कोटी ८३ लाख अपेक्षित केला होता. तो सुधारित अर्थसंकल्पात २६७२ कोटी ७९ लाख अपेक्षित असून भांडवली खर्च १६६० कोटी ९१ लाखांऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो २०४९ कोटी ४३ लाख सुधारित करण्यात आले आहे. यात अतिरिक्त खर्च करणे टाळण्यात आले असून भांडवली खर्चावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सफाई कामगारांची आरोग्य तपासणी, सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वच्छ शौचालय, खड्डेमुक्त ठाणे, रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

याशिवाय प्रसुतीगृहांचे बळकटीकरण, ज्येष्ठ नागरीकांसाठी सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याणकारी योजना, मुकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान, औषध चिठ्ठीमुक्त रुग्णालये, आपला दवाखान्यांची संख्या वाढविणे, गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटलचे विस्तारीकरण, इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पीटल, कौसा हॉस्पाटील कार्यान्वित करण्याबरोबर याच ठिकाणी कर्करोग व उपचार व सुविधा निर्माण करणे, कळवा रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याबरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरणे, सुंदर शाळा, निसर्ग वाचनालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय, हरित विकास कार्यक्रम, प्रदूषण मुक्त व धुळमुक्त ठाणे, पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण, मलनिसारण योजना, वाहतुक कोंडी सोडविण्यावर भर तसेच पार्किंग व्यवस्था वाढविण्यावर भर, नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी प्रयत्न, क्लस्टर योजना, धर्मवीर आनंद दिघे स्मारक, आनंद आश्रम परिसर सुधारणा, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतीगृह, कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर, परिवहन सेवा मजबुतीकरण, उपर्दव शोधपथक, अ‍ॅडव्हास लोकॅलीटी मॅनेजमेंट आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

शहर सौंदर्यीकरणावर भर

प्रकल्प २.० राबविण्यासाठी ५० कोटी, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरणासाठी २० कोटी, राज्य सरोवर संवर्धन योजना, ग्रीन संस्थेकडून तलाव संवर्धन आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांना शून्य व्याजदराने कर्ज, धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना, महिला बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, महिलांसाठी विशेष परिवहन सेवा, महिला सुरक्षितता, माझी आरोग्य सखी, महिला शौचालय, मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना आदींसह इतर योजनांवर भर दिला जाणार आहे.

यंदा शहरभर शून्य कचरा मोहीम

- घंटागाडी योजनेंतर्गत ८० कोटी

- कचरावेचक सोयीसुविधांसाठी ४ कोटी ५० लाख

- नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५ कोटी

- यांत्रिकी कचरा प्रक्रिया केंद्रासाठी १ कोटी ५० लाख

- सार्वजनिक रस्ते सफाई ८५ कोटी

- स्वच्छता मोहीम ३० लाख

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in