ठाणे महापालिका निवडणुकीत ११४ कोट्यधीश; परिषा सरनाईक सर्वाधिक श्रीमंत; सर्वात कमी उत्पन्न मुंब्रामधील उमेदवाराचे

कोट्यधीश उमेदवारांमध्ये शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, या निवडणुकीत एकूण ६४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांनुसार त्यापैकी ११४ उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या कोट्यधीश उमेदवारांमध्ये शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक या या निवडणुकीतील सर्वाधिक संपत्ती असलेल्या उमेदवार ठरल्या असून, त्यांच्या शपथपत्रात एकूण ३८१ कोटी रुपयांची मालमत्ता नमूद करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, मुंब्रा येथील शरद पवार गटाचे उमेदवार खांचे मोहम्मद जैद अतिक खांचे यांचे वार्षिक उत्पन्न केवळ २० हजार ५०२ रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद असून, ते सर्वात कमी उत्पन्नाचे उमेदवार ठरले आहेत.

शिंदे सेनेचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात १२६ कोटी ६६ लाख रुपयांची मालमत्ता दर्शविली आहे. कळवा येथील तरुण उमेदवार मंदार कोणी यांच्या नावावरही १०५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.

शिंदे सेनेच्या उमेदवारांची संपत्ती

उषा भोईर (२९.५३ कोटी), सपना भोईर (१४.६८ कोटी), देवराम भोईर (१५.१७ कोटी), संजय भोईर (२९.५३ कोटी), सिद्धार्थ पांडे (९.४९ कोटी), सुलेखा चव्हाण (१७.९५ कोटी), कल्पना पाटील (३२.६१ कोटी), हणमंत जगदाळे (६३.४४ कोटी), अशोक वैती (३५.५६ कोटी), दर्शना व योगेश जानकर (१५.८५ कोटी), शिल्पा वाघ (१६.७९ कोटी), मनोज शिंदे (२९.९४ कोटी), एकता भोईर (१५.८५ कोटी), जयश्री फाटक (६५.२५ कोटी), नम्रता पमनानी (१५.५१ कोटी), अनिता गौरी (१५.६६ कोटी), मनाली पाटील (६१.६८ कोटी), मिलिंद पाटील (५०.६२ कोटी), महेश साळवी (१२.९८ कोटी), शैलेश पाटील (२२.३९ कोटी) यांचा समावेश आहे.

भाजप, उद्धव सेना, राष्ट्रवादी, मनसेतील कोट्यधीश

भाजपकडून स्नेहा आंब्रे (१६.२० कोटी), अमित सरय्या (२६.२२ कोटी), भरत चव्हाण (१६.६७ कोटी), प्रतिभा मढवी (४३.५७ कोटी), नंदा व कृष्णा पाटील (५१.२० कोटी) हे कोट्यधीश उमेदवार आहेत.

उद्धव ठाकरे गटाकडून महेश्वरी तरे (२३.४४ कोटी), नंदिनी विचारे (४१.८७ कोटी), रोहिदास मुंडे (१६.२२ कोटी) तर अजित पवार गटाचे नजीब मुल्ला (९.५३ कोटी) आणि शरद पवार गटाचे हिरा पाटील (२१.०९ कोटी) अशी मालमत्ता दाखविण्यात आली आहे. मनसेच्या रेश्मा पवार यांनी १७.७८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

अपक्ष उमेदवारही कोट्यधीश

अपक्ष उमेदवारांमध्ये प्रमिला केणी (६१.६८ कोटी), कविता पाटील (५५.८२ कोटी),विकास दाबाडे (२२.०८ कोटी), लॉरेन्स डिसोझा (१६.२७ कोटी), भूषण भोईर (१४.६८ कोटी) यांचा समावेश आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत एकीकडे लोकप्रतिनिधित्वाचा दावा केला जात असताना, दुसरीकडे उमेदवारांच्या शपथपत्रातून संपत्तीतील मोठी तफावत समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in