

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांकडून २६९ तक्रारी दाखल झाल्या होत्या, तरी अंतिम प्रभाग रचना जाहीर करताना त्यात फक्त किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यामुळे आलेल्या तक्रारींना एक प्रकारे केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून आले आहे. लोकमान्यनगर (प्रभाग क्रमांक ६) आणि पवारनगर (प्रभाग क्रमांक ५) वगळता उर्वरित प्रभागांची रचना जसाची तशी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकारल्या गेल्या व त्यावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. नगर विकास प्राधिकृत अधिकारी संजय सेठी विभागाने नियुक्त केलेल्या यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. प्राप्त हरकती व सूचनांचा सांगोपांग विचार करून सेठी यांनी आपला अभिप्राय नोंदवला होता.
या अभिप्रायांच्या अनुषंगाने आवश्यक बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव १५ सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव १ ऑक्टोबर रोजी मान्य केला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत, सूचना किंवा सुनावणी नियमानुसार होणार नाही.
प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात २६९ तक्रारी आल्याने उध्दव सेना, मनसे, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुनावणीस उपस्थित राहून एका पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप केला होता. तर भाजप आणि अजित पवार गटाने काही प्रभागांबाबत आपले हरकती नोंदविल्या होत्या.
अंतिम प्रभाग रचनेत लोकमान्यनगर (प्रभाग ६) चा रामबाग परिसर पवारनगर (प्रभाग ५) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हे दोन प्रभाग वगळता उर्वरित प्रभागांची रचना जसाची तशी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
आरक्षणासाठी लवकरच सोडत काढणार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अखेर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने २२ ऑगस्ट रोजी ड्राफ्ट प्रभाग रचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. या प्रक्रियेत नागरिकांकडून तब्बल २६४ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये २१४ हरकती प्रभाग हद्द व वार्ड संदर्भातील होत्या. ११ सप्टेंबर रोजी या हरकतींवर सुनावणी पार पडली होती. सुनावणीनंतर तयार झालेला अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. आता आयोगाने या अहवालाला मान्यता देत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. एकूण २६४ हरकतींपैकी केवळ ८ हरकतींना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी ४ हरकती प्रभाग हद्दीसंबंधी आणि ४ हरकती व्याप्तीसंदर्भात आहेत. बहुतांश हरकती फेटाळल्या गेल्या आहेत. महापालिका उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच अंतिम प्रभाग रचनेच्या याद्या व सूचना केडीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर, पालिका मुख्यालयात तसेच प्रत्येक वाड्यात नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता प्रभाग रचना अंतिम झाल्याने निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.