ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांसमोर पेच उभा राहिला असून अनधिकृत बांधकामाबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने ठाणे महापालिकेची याच मुद्यावरुन कान उघडणी केली आहे. आता ठाणे महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता शपथपत्र लिहून देताना याच अनधिकृत बांधकामाबाबतही शपथपत्र द्यावे लागणार आहे. मी स्वतः किंवा माझी पत्नी, पती, माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. निवडून आल्यानंतर मी अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यास असमर्थ ठरेन, असे शपथपत्रात नमूद करावे लागणार आहे.
ठाण्यातील बहुसंख्य भाग हा झोपडपट्टीने व्यापला आहे, कळवा, दिवा, मुंब्रा, घोडबंदर, किसनगर आदींसह इतर भागात गेल्या अनेक वर्षांपासून अनाधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. अनेक माजी नगरसेवक किंवा इच्छुक हे याच ठिकाणी राहत असल्याने आता त्यांच्याकडून हे शपथपत्र दिले जाणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. ठाणे शहर हे अवैध बांधकामांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. याच अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन १४ आजी, माजी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी लागलेल्या आहेत. परंतु त्यातून अद्याप काही निष्पन्न झालेले नाही. शिवाय घोडबंदर असेल किंवा वागळे, कोपरी, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागात तर मागील काही वर्षात अनाधिकृत बांधकामांची संख्या वेगाने वाढतांना दिसून आली आहे. दिवा परिसर तर हा ९० टक्के भाग अनाधिकृत बांधकामांनी व्यापलेला आहे. येथील काही माजी नगरसेवक हे आजही अनाधिकृत बांधकामांत व्यवसायात आहेत. तसेच कळवा, घोडबंदर भागातील मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर, ओवळा, आदींसह इतर भागात देखील अशाच पध्दतीने काही माजी नगरसेवक हे अनधिकृत बांधकामांमध्ये व्यावसायिक आहेत.
अवैध बांधकामात नेते
दिवा परिसर हा ९० टक्के अनधिकृत आहे. दिव्यातील माजी नगरसेवक अनधिकृत बांधकाम व्यवसायात आहेत. तसेच कळवा, घोडबंदर भागातील मानपाडा, ओवळा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील अनेक माजी नगरसेवक या व्यवसायात आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.