

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी टिकणारी मार्कर खूण केली जाणार आहे. महापालिका निवडणूक विभागाने निवडणुकीची प्रक्रिया शांत, निर्भय आणि सुरळीत पार पडावी, यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.
ठाणे महानगरपालिकेतील ३३ प्रभागांमध्ये एकूण २,०१३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर किमान दोन मार्कर पेन ठेवले जातील. ५ टक्के राखीव साठ्यासह सुमारे ४,५०० मार्कर पेनची जुळवाजुळव सुरू आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती अशी, मतदाराची ओळख पटल्यावर मतदान केंद्रात प्रवेश दिला जातो. मतदानापूर्वी डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्करची खूण केली जाते. ही खूण न पुसली जाणारी असल्यामुळे निवडणूक शांतीत आणि फसवणूक न करता पार पडते. डाव्या हाताची तर्जनी नसल्यास, इतर बोटावर खूण केली जाईल. यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो आणि मतदान केंद्राध्यक्ष (पोलिंग अधिकारी) बोटावरील खूण तपासतात.
ठाणे महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, महापालिका क्षेत्रातील एकूण १६,४९,८६७ मतदारांमध्ये ८,६३,८७८ पुरुष आणि ७,८५,८३० महिला मतदार आहेत. १३१ उमेदवारांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, लोकशाहीचा हा उत्सव कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.