

ठाणे : एकीकडे महायुतीत सखोल चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असताना, दुसरीकडे ठाण्यात महाविकास आघाडीतील जागावाटपाचे गणित मात्र अद्याप अंतिम होऊ शकलेले नाही. विशेषतः काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी करण्यात येत असल्याने महाविकास आघाडीचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच पहाटे दोन वाजेपर्यंत झालेल्या बैठकीनंतरही महाविकास आघाडीतील जागावाटपावर एकमत होऊ शकलेले नाही. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. ज्या प्रभागात संबंधित पक्षाचा उमेदवार अधिक सक्षम आणि मातब्बर असेल, त्याला उमेदवारी देण्यावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. तसेच काही ठिकाणी मनसेचा उमेदवार शिवसेनेच्या (उद्धव गट) चिन्हावर, तर काही ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवेल, अशी तजवीजही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला
ठाणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार, हे जवळपास निश्चित झाले असून, त्यासाठी अनेक बैठका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. त्यानुसार मनसेला ३१ ते ३२, शिवसेना (उद्धव गट) ला ५० ते ५५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला ३५ ते ४०, तर काँग्रेसला ५ ते १० जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याने आगामी राजकारणात नक्कीच बदल घडले अशी अशा व्यक्त केली जात आहे.
या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेचे ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्या जागेवर कोण लढणार, याबाबत एकमत झाले असून, काही जागांवर उमेदवारांची अदलाबदल करण्याचीही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, शहरातील पाच ते सहा जागांवरून अद्याप आघाडीत एकमत न झाल्याने या जागांबाबत दोन दिवसांत अंतिम चर्चा होणार आहे. या जागा नेमक्या कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसची अपेक्षेपेक्षा अधिक मागणी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने कळवा, मुंब्रा तसेच ठाण्यातील काही जागांवर आपला दावा ठामपणे मांडला आहे. या तीनही पक्षांमध्ये बहुतांश बाबींवर सहमती होत असतानाही, काँग्रेसने मात्र अपेक्षेपेक्षा अधिक जागांची मागणी केल्याने चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुटलेले नाही. काँग्रेसकडून ठाणे शहरातील पाच, कळव्यातील पाच तसेच मुंब्र्यातील काही जागांवर थेट दावा करण्यात आला असून, या भागात काँग्रेसचा पारंपरिक मतदार असल्याचा दावाही पक्षाकडून करण्यात येत आहे. काँग्रेसला एकूण २५ ते ३० जागांची अपेक्षा असल्याने महाविकास आघाडीतील चर्चा पुढे सरकू शकलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही’
महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही, तसेच त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असताना आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून परस्पर उमेदवार जाहीर केला जात असून, हा प्रकार आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, आघाडीतील एखाद्या पक्षाने आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असता, तर ते समजण्यासारखे होते. मात्र अद्याप उमेदवाराला पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आलेला नसताना अभिजीत पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करणे आणि त्यासाठी जाहीर रॅली काढणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः उपस्थित राहतात, हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचा वापर करून घेतला गेला; मात्र आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असताना राष्ट्रवादीकडून स्वतंत्र सवतासुभा उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे आहे,” अशी टीका विक्रांत चव्हाण यांनी केली.
कळव्यात काँग्रेसकडे चार सक्षम उमेदवार तयार असून, तेवढ्याच संख्येने मतदारही आमच्याकडे आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. काँग्रेसकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा शेवटचा पर्याय अजूनही खुला असून, पक्ष त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेईल, असेही विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.