

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आजपासून उमेदवारांना नामनिर्देशन अर्जांचे वाटप सुरू झाले आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ९ प्रभाग समितींमधून १,०६९ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २, ३ व ८ साठी एकूण १५७ नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत ४, ५ व ७ या प्रभागांसाठी एकूण १०३ अर्जांचे वाटप झाले. लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समिती अंतर्गत ६, १३, १४ व १५ या प्रभागांसाठी १७७ नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले.वागळे प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या १६, १७ व १८ या प्रभागांसाठी एकूण १०२ अर्जांचे वाटप झाले.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत १९, २०, २१ व २२ या प्रभागांसाठी एकूण ११३ नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत १०, ११ व १२ या प्रभागांसाठी १०१ अर्जांचे वाटप करण्यात आले. कळवा प्रभाग समिती अंतर्गत ९, २३, २४ व २५ या प्रभागांसाठी एकूण १२१ नामनिर्देशन अर्जांचे वाटप झाले. मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत २६ व ३१ या प्रभागांसाठी ३५, तर ३० व ३२ या प्रभागांसाठी ३६ नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले. दिवा प्रभाग समिती अंतर्गत २७ व २८ या प्रभागांसाठी ७८, तर २९ व ३३ या प्रभागांसाठी ४६ अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नामनिर्देशन अर्जांच्या वाटपास मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.