

ठाणे : ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. यादिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. त्यांच्यासाठी तळ मजल्यावर व्यवस्था करण्यात आली असून व्हिलचेअर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार आवश्यक असलेले मनुष्यबळ सज्ज करण्यात आले आहे. ठाण्यात ४ लाख नव्या मतदारांची वाढ झाली आहे. त्यानुसार १६ लाख ४९ हजार ८६७ मतदारांची संख्या झाली आहे. यात पुरुष मतदारांची संख्या ८६३८७८ एवढी असून स्त्री मतदारांची संख्या ७८५८३० एवढी आहे. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आजारी, वृध्द नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान करुन घेतले जात होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ही सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अशा वृध्द मतदारांसाठी तळ मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबरोबरच त्याठिकाणी मतदानासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांच्या ठिकाणी व्हिलचेअरची सुविधा देखील पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.