ठाणे : महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या लोकोपयोगी प्रकल्पांचा फायदा लाखो ठाणेकर नागरिकांना होणार आहे. त्यात कासारवडवली येथील खाडीकिनारी टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे टाऊन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲॅडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय तसेच ठाणे आंतरराष्ट्रीय मेट्रो जोडणी आदी विविध प्रकल्पांचा समावेश असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
या पत्रकार परिषदेस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
ठाणे शहरातील कासारवडवली खाडीकिनारी येथील ५० एकर जागेत मंगल कलशाच्या संकल्पनेनुसार २६० मीटर उंचीचा देशातील सर्वात मोठा टॉवर आयफेल टॉवरच्या धर्तीवर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे आयफेल टॉवरची उंची ही ३०० मीटर आहे. याठिकाणी ‘व्ह्यूइंग टॉवर’ आणि ‘कन्व्हेन्शन सेंटर’चा समावेश असणार आहे. हे काम हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले आहे.
कोलशेत येथे २५ एकर जागेवर बीओटी तत्त्वावर टाऊन पार्क उभारण्यात येत आहे. या टाऊन पार्कमध्ये आगरी कोळी संग्रहालय, विज्ञान सेंटर, मत्सालय आणि क्रीडा संकुल यांचा समावेश असणार आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तळ अधिक एक मजली एलिव्हेटेड उद्यानांचा समावेश आहे.
कोलशेतला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, मनोरंजन पार्क, साहसी पार्क २५ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. कोलशेत येथे १२.५ एकर जागेत पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीचा भाग म्हणून ५० एकर जागेत स्पोर्ट्स अरेना उभारण्यात येणार आहे, तर २५ एकर जागेत म्युझिकल कॉन्सर्ट तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
बुलेट ट्रेन स्टेशनला मेट्रो जोडणार
ठाणेकरांचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्यासाठी ठाण्यात मेट्रो सेवा लवकरच सुरू होत आहे. या मेट्रो सेवेला म्हातार्डी बुलेट ट्रेन स्टेशन, दिवा, मुंब्रा, कळवा हे मार्ग जोडले जाणार आहेत. एकूण ९.८ किमीचा प्रवासाचा मार्ग असणार आहे, तर म्हातार्डी ते कोपर मार्गे डोंबिवली ४.१ किमी आणि म्हातार्डी ते तळोजा मेट्रो लाइन १२ शी जोडणारा ३.२ किमीचा हा मार्ग असणार आहे. यासाठी डीपीआर महामेट्रो तयार करत आहे.
एकूणच ठाणेकरांना जास्तीत जास्त मूलभूत सोयीसुविधा आणि मनोरंजनात्मक साधने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.