ठाण्यात महायुतीचा नवा 'फॉर्म्युला' समोर; मित्र पक्षांनाही जागा, लवकरच होणार घोषणा?

अखेर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली असून, प्रमुख नेत्यांमध्ये तब्बल पाच तासांच्या सखोल चर्चेनंतर महायुतीचे अवघड झालेले गणित सुटल्याचे सांगितले जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : अखेर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली असून, प्रमुख नेत्यांमध्ये तब्बल पाच तासांच्या सखोल चर्चेनंतर महायुतीचे अवघड झालेले गणित सुटल्याचे सांगितले जात आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी महायुतीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंगळवारी रात्री सुरू झालेली बैठक पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल पाच तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेश म्हस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते. या चर्चेअंती शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.

वरिष्ठ पातळीवर महायुती जाहीर झाली असली, तरी ठाण्यात स्थानिक पातळीवर झालेल्या दोन बैठकींनंतरही शिंदे सेनेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केली होती. त्यानंतर शिंदे सेनेकडून १३१ जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ठाण्यातील ‘शुभदीप’ या निवासस्थानी झालेल्या पहाटेपर्यंतच्या बैठकीनंतर हा संभ्रम दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही पाच तासांची चर्चा पार पडली. त्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमध्ये महायुतीच्याच माध्यमातून निवडणुका लढवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

हा असू शकतो महायुतीचा फॉर्म्युला

या बैठकीत येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागनिहाय उमेदवारांबाबत चर्चा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला ८१, भाजपला ४५, तर मित्र पक्ष असलेल्या आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या पक्षांना प्रत्येकी मिळून पाच जागा देण्यात येतील, अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपची ताकद वाढणार

दरम्यान, ठाण्यात भाजपने सुरुवातीला ५५ जागांची अपेक्षा व्यक्त केली होती आणि शिंदे सेनेच्या काही जागांवरही दावा केला होता. अखेर भाजपच्या वाट्याला ४५ जागा येतील, असे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत. सध्या भाजपकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळ असून, त्यात सुमारे २१ जागांची वाढ होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, या वाढीव जागा नेमक्या कुठल्या भागात मिळणार, याबाबत उत्सुकता असून, मुंब्रा परिसरात भाजपला काही जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in