Thane : 'अग्नि'सुरक्षेचा बोजवारा! महापालिकेच्या मुख्यालयातच अनेक यंत्रणा निकामी; दुरुस्तीसाठी ४३.३६ लाखांचा प्रस्ताव

ठाणे शहरातील उंच इमारती, मॉल, रुग्णालये आणि व्यावसायिक संकुलांना अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी नोटीस बजावणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मुख्यालयातच अग्निसुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Thane : 'अग्नि'सुरक्षेचा बोजवारा! महापालिकेच्या मुख्यालयातच अनेक यंत्रणा निकामी; दुरुस्तीसाठी ४३.३६ लाखांचा प्रस्ताव
Thane : 'अग्नि'सुरक्षेचा बोजवारा! महापालिकेच्या मुख्यालयातच अनेक यंत्रणा निकामी; दुरुस्तीसाठी ४३.३६ लाखांचा प्रस्तावप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : शहरातील उंच इमारती, मॉल, रुग्णालये आणि व्यावसायिक संकुलांना अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी नोटीस बजावणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मुख्यालयातच अग्निसुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धूर शोधकांपासून अग्निशमन पंपांपर्यंत अनेक महत्त्वाच्या यंत्रणा निकामी किंवा अपुऱ्या अवस्थेत असल्याचे प्रशासनालाच मान्य करावे लागले असून, त्या दुरुस्त करण्यासाठी तब्बल ४३ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा खर्च करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

विशेष म्हणजे, ही बाब एखाद्या नियमित तपासणीत नव्हे, तर गावदेवी भाजी मंडईतील भीषण आग आणि त्यात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर समोर आली. या घटनेमुळे महापालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर सर्वच स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी याच मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरत, ‘महापालिकेचे मुख्यालयच सुरक्षित नसेल, तर नागरिकांना सुरक्षा कशी देणार?’ असा थेट सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी मुख्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणाच सक्षम नसल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या.

मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील इमारतींकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसल्यास कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन स्वतःच्या मुख्यालयातील त्रुटींकडे इतके दिवस दुर्लक्ष कसे करत होते? दोन जणांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग का आली? जर अशीच दुर्घटना महापालिका मुख्यालयात घडली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची असती? असे अनेक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

मुख्यालयातील स्मोक डिटेक्टर, एबीसी आणि कार्बन डायऑक्साइड अग्निशमन यंत्रे, मुख्य फायर पंप, बूस्टर पंप, स्टँडबाय पंप, रायझर लाइन, लँडिंग व्हॉल्व्ह, पाईप रिळ, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक, रिस्पॉन्स इंडिकेटर तसेच मॅन्युअल फायर अलार्म कॉल पॉइंट्स या अत्यावश्यक यंत्रणांची दुरुस्ती अथवा बदल करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी ४३.३६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या मुख्यालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील उणिवा उघड झाल्याने केवळ एका इमारतीचा नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता ४३ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून यंत्रणा कार्यान्वित करण्यापलीकडे, भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा होणार नाही, याची ठोस हमी प्रशासन कशी देणार? याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in