

ठाणे : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीनंतर आता अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्याही प्रकारचे बदल झाले नसून मतदारांची संख्या ‘जैसे थे’ अशीच असल्याचे दिसून येत आहेत. एकूण मतदारसंख्येत फारसा बदल नसला तरी काही प्रभागांतील मतदारांमध्ये वाढ आणि घट झाल्याचे दिसत आहे. प्रभाग क्रमांक २७ मधील ४३३ आणि प्रभाग क्रमांक २८ मधील ३ मतदारांची संख्या घटली असून, प्रभाग क्रमांक २९ मध्ये ४३६ मतदारांची वाढ झाल्याचे अंतिम यादीत दिसून येते.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले असून, निवडणूक विभागाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. मतदार नोंदणीचा आढावा घेतला असता, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाणे महापालिका क्षेत्रात ४ लाख २१ हजार २५६ नवीन मतदारांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकूण मतदार संख्या १२ लाख २८ हजार ६०६ होती. यात ६ लाख ६७ हजार ५०४ पुरुष, ५ लाख ६१ हजार ०८७ महिला आणि १५ इतर मतदारांचा समावेश होता. यंदाच्या अंतिम मतदार यादीत पुरुष मतदार संख्या ८ लाख ६३ हजार ८७४, महिला मतदारसंख्या ७ लाख ८५ हजार ८३०, तर इतर मतदार १५८ झाली आहे. त्यानुसार एकूण मतदारांची संख्या ही १६ लाख ४९ हजार ८६७ आहे. प्रारुप यादीत असलेली मतदारांची संख्या ही ‘जैसे थे’ अंतिम यादीत ठेवली आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ३ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून आयोगाच्या आदेशानुसार सोमवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
अंतिम मतदार यादीत दिवा स्टेशन, नागवाडी व साईनाथनगर परिसरातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये ४३३, तर मुंब्रा देवी कॉलनीतील प्रभाग क्रमांक २८ मध्ये ३ मतदारांची घट झाली आहे. तर दिवा पूर्व, साबेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये ४३६ मतदारांची वाढ नोंदवली आहे. त्यामुळे वाढलेल्या आणि घटलेल्या मतदारांचा राजकीय कल कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकतो, हे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीतील महत्त्वाचे औत्सुक्य ठरणार आहे.
दुबार मतदारांच्या ठिकाणी दोन शिक्के
ठाणे महापालिका हद्दीत ८३ हजार दुबार मतदार आढळून आले आहेत. हे दुबार मतदार जिथे आढळतील त्या ठिकाणच्या मतदार यादीत ते मतदार दुबारचा शिक्का मारण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या सूत्रांनी दिली.