ठाणे पालिकेचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; आर्थिक उत्पन्नाच्या विभागात घट; ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचे बजेट

पालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने अपेक्षेप्रमाणेच कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २०२५- २६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला.
ठाणे पालिकेचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; आर्थिक उत्पन्नाच्या विभागात घट; ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचे बजेट
एक्स @TMCaTweetAway
Published on

ठाणे : पालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने अपेक्षेप्रमाणेच कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २०२५- २६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिकेवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्याने हाती घेण्यात येणारे प्रकल्प ही खासगी लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प हा काटकसरीचा अर्थसंकल्प आहे. अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे. भांडवली खर्चापेक्षा महसूल खर्च अधिक असून महसुली खर्च हा ३७२२ कोटी ९३ लाख तर भांडवली खर्च हा १९२१ कोटी ४१ लाख असल्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे

सौरभ राव यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून यांनी आपला पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. २०२४-२५ चे ५०२५ कोटी १ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सुधारित करून आरंभीच्या शिलकेसह ६५५० कोटी व २०२५-२६ च्या आरंभीच्या शिलकेसह ५६४५ कोटीचा अर्थसंकल्प सादर सौरभ राव यांनी सादर केला. सन २०२४-२५ मध्ये रु. ५०२५ कोटी १ लाख रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणीपुरवठा आकार, करवसुली, जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३४५४ कोटी ८३ लाखांऐवजी ३२२० कोटी ४२ लाख सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता, मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. २८४ कोटी ३२ लाख अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर २०२४ अखेर ९१४ कोटी ३५ लाख अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी ११६२ कोटी ७१ लाख अपेक्षित केले आहे व अमृत २.०० योजनेसाठी २० कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते, परंतु मार्च २०२५ अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही. खर्च बाजूस सन २०२४-२५ मध्ये महसुली खर्च रु. ३३४५ कोटी ६६ लाख प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.३०३४ कोटी ७७ लाख अपेक्षित असून भांडवली खर्च रु. १६७९ कोटींऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च २०६७ कोटी ५० लाख सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक व शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभुत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत.

पालिकेवरील आर्थिक भार कमी करणार...

अर्थसंकल्प सादर करतांना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे, किंवा मिळाला त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पिटल, गडकरी रंगायतन, तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण, हरित ठाणे उपक्रम, एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नव्याने महापालिकेच्या माध्यमातून कोलशेत येथे ॲम्युजेमंट पार्क, स्रो पार्क प्रकल्प, दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब, एमआरटीएसने आरक्षित भूखंडावर इनडोअर स्पोर्ट्स क्लब व वाचनालय, ठाणे टाऊन पार्क, व्हिविंग टॉवर ॲण्ड कन्व्हेंशन सेंटर आदी प्रकल्प हे पीपीपीच्या माध्यमातून करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.

शासनाच्या अनुदानावर मदार

मागील वर्षी ठाणे महापालिकेने अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरले होते. परंतु प्रत्यक्षात पालिकेला ९१४ कोटी अनुदानापोटी मिळाल्याने आता पुन्हा २०२५-२६ मध्ये ६१२ कोटी ५९ लाख इतके अनुदान अपेक्षित धरले आहे. यात पायाभुत सुविधांसाठी ३०० कोटी, कळवा रुग्णालय ३ कोटी, एकात्मिक स्मशानभूमी नूतनीकरण १० कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम १२ कोटी १९ लाख, १५ वा वित्त आयोग २६ कोटी, एमएमआरडीएकडून १ कोटी, नागरी सेवा सुविधांसाठी २५ कोटी, अमृत योजना २ साठी ४८ कोटी ५२ लाख, राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे संवर्धन ५ कोटी ६२ लाख अपेक्षित धरण्यात आले आहेत.

६५० कोटी ८० लाख इतके उत्पन्न अपेक्षित

सन २०२४-२५ मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी ७५० कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. शहर विकास विभागाकडून प्राप्त झालेले डिसेंबर २०२४ अखेरचे उत्पन्न रक्कम ३८५ कोटी ९ लाख विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रक्कम ५८२ कोटी १५ लाख सुधारित करण्यात आले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६५० कोटी ८० लाख इतके उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहे.

स्थानिक संस्था करातून उत्पन्न अपेक्षा

स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज एकूण १३५३ कोटी ४३ लाख अपेक्षित केले आहेत. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी वस्तू व सेवाकर अनुदानापोटी १२३३ कोटी ७९ लाख , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली ८ कोटी असे एकूण १४४१ कोटी ७९ लाख उत्पन्न अपेक्षित आहे.

पाच वर्षांत ठाणे स्वयंपूर्ण होणार

येत्या पाच वर्षांत ठाणे स्वयंपूर्ण करण्यासाठी ठाण्यात गुंतवणूक वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेने केले आहे. यासाठी शहरात आयटी सेंटर आणि डेटा सेंटर आणून या माध्यमातून ही रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणाऱ्या ठाणेकरांना भविष्यात मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय यावर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या हॅपिनेस इंडेक्सवरही विशेष भर देण्यात आला असून ठाणेकरांना ठाण्यात राहावेसे वाटले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

जाहिरात फीमधून २२ कोटी उत्पन्न अंदाजित

जाहिरात फी पोटी सन २०२४-२५ मध्ये २४ कोटी ६२ लाख उत्पन्न अपेक्षित केले होते. डिसेंबर २०२४ अखेर प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न ९ कोटी ५३ लाख झाले असल्याने सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फीपासून १२ कोटी ३० लाख उत्पन्न अपेक्षित केले असून सन २०२५-२६ मध्ये २२ कोटी उत्पन्न अंदाजित केले आहे.

अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये

कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प

महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

खर्चामध्ये वित्तीय शिस्त

पोषक व शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना

गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे

महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर

प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर

कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष

वृक्षगणना व वृक्षसंवर्धन

६०० ते ८०० TPD क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प

सोलोराईज्ड मेकॅनिकल कम्पोस्टिंगद्वारे ओल्या घनकचऱ्यापासून खत निर्मिती

ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प

शून्य कचरा मोहीम - संपूर्णत: नवीन कचरा संकलन यंत्रणा

वाहतुककोंडी, खड्डेमुक्त ठाणे

वाहतुककोंडीमुक्त ठाणे करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असून, त्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ठाणे घोडबंदर रस्त्यांचे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यांचे मुख्य रस्त्यामध्ये समावेश, घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वेचा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, अंतर्गत मेट्रो, मुख्य मेट्रो, ठाणे-बोरिवली टनेल, कोस्टल रोड आदींच्या कामांमुळे येत्या काळात ठाणे वाहतूककोंडीमुक्त होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्यावर भर देण्यात येणार आहे.सार्वजनिक रस्ते साफसफाई

शासनाच्या अनुदानावर निर्भर

सन २०२४-२५ मध्ये शासनाकडून डिसेंबर २०२४ अखेर ९१४ कोटी ३५ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रु. ६१२ कोटी ५९ लाख अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांतर्गत ३०० कोटी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नूतनीकरण व सुधारणा ५ कोटी, एकात्मिक स्मशानभूमी नूतनीकरण कार्यक्रम १० कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नूतनीकरण रु. १२ कोटी १९ लाख, पंधरावा वित्त आयोग रु. २६ कोटी, एमएमआरडीकडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत १ कोटी, महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेंतर्गत २५ कोटी, अमृत योजना फेज २ साठी ४८ कोटी ५२ लाख, राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील ६ तलावांचे संवर्धनासाठी ५ कोटी ६२ लाख इत्यादी भांडवली अनुदानांचा समावेश आहे.

ई-ऑफिस प्रणालीवर महापालिकेचे कामकाज

ठाणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच कामाचा वेग वाढावा, यासाठी यापुढे पालिकेचा कारभार हा ई-प्रणालीच्या माध्यमातून चालणार असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे महापालिकेत आता कागदी घोडे नाचवण्याऐवजी सर्व फाइल आणि महत्त्वाचे प्रस्ताव आता यापुढे ऑनलाइन पद्धतीने हाताळण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच ठाणे महापालिकेच्या कारभारात ई-ऑफिस प्रणालीवर भर देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. मंत्रालयात देखील या पद्धतीच्या माध्यमातून पाठपुरावा करणे सोईचे होणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या वर्षभरात महापालिकेचा कारभार हा १०० टक्के ई-ऑफिस प्रणालीवर करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणीपुरवठा वसुली कमीच

पाणीपुरवठा आकारासाठी सन २०२४-२५ मध्ये रु. २२५ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. यामध्ये मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. पाणीपुरवठा आकाराचे सुधारित अंदाज रु. २०० कोटी अपेक्षित केले असून सन २०२५-२६ मध्ये रु. २५० कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.

२०२४- २५ मध्ये पूर्ण झालेले प्रकल्प

पद्मश्री सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल

कौसा हॉस्पिटल कार्यान्वित

स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाचे नूतनीकरण

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत आत्तापर्यंत १,२४,१४४ वृक्षांची लागवड

ठाण्यात ४८४५ सोडियम व्हेपर दिव्यांच्या जागी एलईडी दिवे बसवले

आदिवासी भागात व डोंगराळ भागामध्ये ४०० नवीन सोलार पथदिप लावण्यात आले.

रहेजा संकुलासमोरील ध्यानधारणा केंद्र व हँगिंग गार्डन

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव बाळकुम कार्यान्वित

स्व. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर

कल्पतरू जलकुंभ, दोस्ती बाळकुम जलकुंभ, पिरामल जलकुंभ, बेथनी जलकुंभांची कामे पूर्ण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी

उपवन तलाव येथे म्युझिकल फाऊंटन उभारण्यात आलेले आहे.

उपवन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घाट व बुरूज

मालमत्ता आणि पाणीपट्टी संलग्न करणार

मालमत्ता कर वसुली समाधानकारक असली तरी, पाणीपट्टी वसुली समाधानकारक नसल्याने या दोन्ही सेवांचे एकच बिल काढण्याचा पालिका स्तरावर विचार सुरू आहे. यासाठी सेवा दोन्ही सेवा संलग्न करण्याचा पालिकेचा विचार सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

स्थावर मालमत्ता २० कोटी ३२ लाख अपेक्षित

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून १२ कोटी ५० लाख अपेक्षित केले होते ते सुधारित अंदाज २० कोटी ३२ लाख अपेक्षित केले आहे. सन २०२५-२६ मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून १५ कोटी ४१ लाख उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.

मालमत्ता करातून महसुलाची वाढ अपेक्षित

मालमत्ता कर व फी पासून सन २०२४-२५ मध्ये रु. ८१९ कोटी ७१ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर २०२४ अखेरचे उत्पन्न ५१२ कोटी ४२ लाख विचारात घेऊन मालमत्ता करापासून ७७६ कोटी ४२ लाख लक्ष सुधारित अंदाज करण्यात येत आहे. मालमत्ता करासाठी संपूर्ण शहराचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामधून महापालिकेच्या महसुलामध्ये वाढ अपेक्षित आहे.

महापालिकेवर ६६ कोटींचे कर्ज

आजमितीस महापालिकेवर ६६ कोटींचे कर्ज शिल्लक आहे. केंद्र शासनाने अमृत २.० अंतर्गत पाणीपुरवठा विस्तार व एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरणासाठी ५५५.१६ कोटी रकमेचा डी.पी.आर. मंजूर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा २५ टक्के राज्य शासनाचा २५ टक्के व महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. महापालिका हिस्स्याची रक्कम म्युनिसिपल बॉन्ड उभारून किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे. सन २०२५ -२६ मध्ये कर्जाद्वारे ६० कोटी ८९ लाख अपेक्षित केले आहे.

प्रत्येक विभागांतर्गत प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान एक सेवा सुलभ करण्याचे नियोजन, नागरिकांना सेवा सुलभ करून देण्याच्या दृष्टिकोनातून ११ सेवांसाठी नियत कालमर्यादा कमी करणे, ठाणेकरांना कमीत कमी कालावधीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आग्रही असणार आहे. ई-ऑफिस प्रणालीद्वारे सर्व पत्रव्यवहार ऑनलाइन करणे, इंटिग्रेटेड कमांचे कंट्रोल सेंटर शहरासाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित केंद्र आहे, जे विविध प्रकारच्या सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वय साधण्यासाठी वापरले जाते. शहराच्या विविध सेवा आणि प्रणालींचे एकत्रीकरण करून हे केंद्र अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत केली जाणार आहे.

- सौरभ राव, आयुक्त महापालिका

logo
marathi.freepressjournal.in