ठाणे पालिकेचा बँडबाजा पॅटर्न हिट; मालमत्ता कराची वसुली ६०० कोटींवर

ठाणे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेला बँडबाजा पॅटर्न हिट ठरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ठाणे पालिकेचा बँडबाजा पॅटर्न हिट; मालमत्ता कराची वसुली ६०० कोटींवर
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेला बँडबाजा पॅटर्न हिट ठरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या दुकानांसमोर पालिकेचा बँडबाजा वाजताच मालमत्ता कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. थकीत मालमत्ता कर भरतो, पण बँडबाजा थांबवा, असे म्हणत व्यापाऱ्यांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता कर भरणाऱ्यांमध्ये १० टक्के वाढ झाल्याने ठाणे पालिकेची मालमत्ता कर वसुली ही ६०० कोटींपर्यंत गेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही पालिकेने कंबर कसली आहे.

मालमत्ता कर आणि पाणी बिल यातून येणारा महसूल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्टपूर्ती तातडीने व्हावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट ८५७ कोटी रुपये देण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत आहे. अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली. संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून ही कर वसुली केले जात आहे.

याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून दुकानांसमोर बँडबाजा वाजवला जात असल्याने पुढचे दुकान आपले नको, यासाठी दुकानदारांनी स्वतःहून मालमत्ता कर भरणा करण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची मालमत्ताकराची वसुली आता ६०० कोटींवर जाऊन पोहचली.

८५० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या माध्यमातून उपायुक्त शंकर पाटोळे यांनी बाजारपेठेत दुकानदारांच्या दारात ढोलताशा वाजवून मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन केले. ही मोहीम यशस्वी झाली असून यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून ८५० कोटींचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in