ठाणे : रस्ते घाण करणाऱ्यांवर पालिकेची नजर; ५० शोध पथकांची नियुक्ती

ठाणे शहरात रस्ते अस्वच्छ करणाऱ्यांची खैर नाही, महापालिकेची पन्नास शोध पथकांची आता ररस्त्यावर करडी नजर असणार आहे.
ठाणे : रस्ते घाण करणाऱ्यांवर पालिकेची नजर; ५० शोध पथकांची नियुक्ती

ठाणे : ठाणे शहरात रस्ते अस्वच्छ करणाऱ्यांची खैर नाही, महापालिकेची पन्नास शोध पथकांची आता ररस्त्यावर करडी नजर असणार आहे. एकीकडे सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे, ठाणे बदलत आहे अशा संकल्पना राबवल्या जात असताना रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवींची संख्या वाढत आहे. या उपद्रवास आळा बसण्यासाठी ठाणे महापालिकेमार्फत ५० शोध पथके तयार करण्यात आली आहेत. हा निर्णय चांगला असला तरी तो ठाणेकरांना शोभनीय नसल्याचे बोलले जात आहे.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांचीही मते जाणून घेतली त्यावेळी ही बाब लक्षात आणून देण्यात आली. अशा उपद्रवी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी सूचनाही सफाई कर्मचाऱ्यांनी केली होती. त्याची सकारात्मक दखल आयुक्तांनी घेतली असून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच महापालिका उपद्रवी पथक तयार करणार असल्याचे सांगितले. वास्तविक रस्त्यावर कचरा करणार्‍या आणि थुंकणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी यापूर्वी क्लिनअप मार्शलची सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. मात्र वसुलीबाजी वाढल्याने हा उपक्रम गुंडाळण्यात आला. दंडातून रक्कम गोळा करणे हा त्यामागचा हेतू नसून शहर स्वच्छतेत बाधा आणणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण शहरामध्ये दर तीन महिन्यांतून एकदा एका प्रभाग समितीमध्ये एक फेरी याप्रमाणे सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी अर्थसकंल्पात ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

दंडात वाढ :

दोन वर्षांपूर्वी पुन्हा विशेष पथक स्थापन करून दंडाची रक्कम वाढवणार असल्याचे पालिकेने जाहीर केले. त्यानुसार रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा दंड १८० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला. थुंकणाऱ्यांना १५० ऐवजी ५०० रुपये दंड, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड, उघड्यावर शौच करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचे ठरवण्यात आले. त्याअंतर्गत काही कारवायाही झाल्या. पण ही कारवाई व्यापक करण्यासाठी आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार उपद्रव शोध पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वच्छता मोहिमेसह विविध उपाययोजना

काही समाजकंटक रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अशा उपद्रवी लोकांना चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रथमच उपद्रव शोध पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन सुरक्षारक्षकांसह ५० शोधपथके संपूर्ण शहरात गस्त घालणार असून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. स्वच्छ आणि सुंदर ठाणे शहरासाठी सर्वंकष स्वच्छता मोहिमेसह विविध उपाययोजना राबवल्या जात असून या प्रयत्नांना काही ठाणेकर नागरिकच हरताळ फासत असल्याची व्यथा सफाई कर्मचारी व्यक्त करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in