Thane : भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार

मुरबाड-कल्याण रोडवरील रायता पुलावर इको कार आणि सिमेंट मिक्सर गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन महिलांसह अकरा जण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले.
भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार
भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार
Published on

नामदेव शेलार/कल्याण

मुरबाड-कल्याण रोडवरील रायता पुलावर इको कार आणि सिमेंट मिक्सर गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन महिलांसह अकरा जण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले.

या पुलावरचे काम अपूर्ण स्थितीत असूनही राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रायता पुलावर वाहतूक सुरू केली, असा आरोप होत आहे. या भीषण अपघातामुळे संतापाची लाट उसळली असून हप्तेबाजी करणाऱ्या आरटीओ पोलीसांना त्वरित बडतर्फ करा आणि रस्त्याचे ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवा, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे.

मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही नम्र विनंती. गोविली गावाजवळच्या रायता पुलावर सकाळी पावणेअकराच्या सुमाराला हा अपघात झाला. कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघालेल्या इको कारला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. ती इतकी भीषण होती की इको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. आत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे रक्तामांसाचा सडा पडला होता. जखमींना बाहेर काढतानाही खूप अडचणी आल्या. अपघातामुळे कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मृतांमध्ये मुरबाड तहसील कार्यालयांमधील मुख्य लिपिक भूषण घोरपडे (वय ४९) यांचा समावेश आहे. घोरपडे कल्याणहून कामावर जात होते. बबलू चंदने (वय २१) जिजा गोविंद केंबारी राहणार टेंबरे(५०), अनंता पवार रा.साखरे, दीपक गवळी, रा.,कल्याण, गणपत मधे रा. देवरालवाडी, नेहा मोपे, मानसी मोपे, प्रथमेश मोपे, सर्व जण राहणार नारायणगाव अशी अन्य मृतांची नावे आहेत.

सरनाईकांचा खुलासा

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता ५+१ असताना त्यामध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मान्य केले आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरनाईकांनी राजीनामा द्यावा- काँग्रेस

मुरबाड -कल्याण मार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनंतर काँग्रेसने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या  नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची आणि बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

अपूर्ण रस्ता आणि बेकायदा वाहतूक

. मुरबाड ते कल्याण दरम्यान पुरेशा एसटी बसेस नाहीत. त्यातच कल्याण तसेच मुरबाड डेपोतून जुन्नर आळेफाटा तसेच नगरकडे जाणाऱ्या बसेसमध्ये अनेकदा मुरबाडच्या प्रवाशांना घेतले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना इको किंवा काळीपिवळी टॅक्सीतून प्रवास करावा लागतो. या इको टॅक्सीमध्ये दहा ते अकरा जणांना कोंबून भरण्यात येते. या अवैध प्रवासी वाहतुकीसाठी कल्याण आरटीओ कल्याण-मुरबाड पोलिसांना मासिक हप्ता दिला जातो, असा आरोप आहे. शिवाय याला एका राजकीय वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे.

२ . मुरबाड-कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तयार करत असून रायता नदीवर नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण माळशेज घाटादरम्यान रायता, धनिवली, मुरबाड तीन हात नाका असे तीन मोठे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही प्रशासनाने प्रवासी वाहतूक सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सरळगाव, उमरोलीपर्यंत रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

. उमरोलीमध्ये जुन्या छोट्या पुलावर स्लॅब टाकून बोगस काम केल्याने पावसाळ्यात मोठे अपघात होण्याचा संभव आहे, असेही बोलले जाते. मुरबाड कल्याण रस्त्यावर वेडी वाकडी वळणे असून अरुंद रस्ते नवीन पुलाला कठडे नाहीत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने असे अपघात घडत आहेत.

. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तरीही पोटगाव मुरबाड येथे टोलनाका उभारून वाहनधारकांना लुटण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे बोलले जाते. नागरिकांनी या टोल नाक्याला तीव्र विरोध केला असून टोलनाका उखडून टाका अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in