Thane : नजीब मुल्लांची आयुक्तांकडे मागणी; मॅरेथॉनच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करा

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या आयोजनातील ढिसाळ नियोजन आणि गैरव्यवस्थापनावरून महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे.
Thane : नजीब मुल्लांची आयुक्तांकडे मागणी; मॅरेथॉनच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करा
Thane : नजीब मुल्लांची आयुक्तांकडे मागणी; मॅरेथॉनच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करा
Published on

ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या आयोजनातील ढिसाळ नियोजन आणि गैरव्यवस्थापनावरून महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. मॅरेथॉनच्या नियोजनाची महापालिकेबाहेरील त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करावी, तसेच स्पर्धकांकडून आकारलेले शुल्क कोणत्याही सक्षम मंजुरीशिवाय घेतले असेल तर ते तातडीने परत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धा सुरू होण्यास झालेला विलंब, मेडल वितरणातील गोंधळ, ई-सर्टिफिकेट मिळण्यात आलेल्या अडचणी आणि रिफ्रेशमेंटची उशिराने झालेली व्यवस्था यामुळे स्पर्धकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे.

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांकडून शुल्क आकारले. हे शुल्क कोणत्या निर्णयाच्या अथवा सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीच्या आधारे आकारले, असा सवाल मुल्ला यांनी उपस्थित केला आहे. महासभा किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणाची मंजुरी नसताना शुल्क आकारण्यात आले असल्यास ते बेकायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आकारलेले शुल्क स्पर्धकांना परत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूर्वी शुल्क नव्हते, यंदा कुणाच्या आदेशाने?

महापालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनसाठी यापूर्वी स्पर्धकांकडून शुल्क आकारले जात नव्हते. मग यंदा शुल्क आकारण्याचा निर्णय कुणी आणि कोणत्या अधिकारात घेतला, त्यासाठी सक्षम मंजुरी घेण्यात आली होती का, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे. मॅरेथॉनच्या आयोजनासाठी नियुक्त केलेली एजन्सी, तिच्यावर सोपविण्यात आलेली कामे, झालेला खर्च, शुल्क आकारणीचा निर्णय आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका यांची चौकशी करावी. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

केवळ खुलासा नको, जबाबदारी निश्चित करा!

मॅरेथॉनसाठी शुल्क आकारूनही स्पर्धकांना वेळेवर आवश्यक सुविधा मिळत नसतील, तर हा प्रकार गंभीर आहे. चौकशी करून दोषी कोण, हे निश्चित करावे. तसेच स्पर्धकांकडून घेतलेल्या शुल्काबाबत तातडीने निर्णय घेऊन ते परत करावे, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in