
ठाणे : मुलुंड-ठाणे दरम्यान निर्माण होणाऱ्या ठाणे नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती देण्याबरोबर मुंबई-ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. वैष्णव यांनी प्रश्न सोडविण्याबाबत सकारत्मता दाखवत ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे आश्वासन दिले.
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले.
महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृहे, सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार महिला शौचालयांची व्यवस्था करावी, प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षारक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत.
स्थानकांवर ‘या’ सोयीसुविधा गरजेच्या
ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे. रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. ठाणे आणि मुलुंडच्या स्टेशनच्या दरम्यान एक नवीन स्टेशनच्या कामाला गती द्यावी. स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी, अशा विविध मागण्या खा. श्रीकांत शिंदे आणि खा. नरेश म्हस्के यांनी केल्या.