

ठाणे : ठाणे शहरात दिवसाच्या कमाल तापमानापेक्षा आता रात्रीच्या वाढत्या किमान तापमानाने अधिक चिंता निर्माण केली आहे. सध्या शहराचे किमान तापमान २७.७ अंश सेल्सिअस नोंदविले जात आहे. जुलैमध्ये रात्री अपेक्षित गारवा जाणवत नसल्याचे चित्र आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, किमान तापमानातील ही सातत्यपूर्ण वाढ शहरातील बिघडत चाललेल्या पर्यावरणीय संतुलनाचा गंभीर इशारा आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात ठाण्यात कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मान्सून उशिरा दाखल झाल्याने उकाड्याचा त्रास अधिक वाढला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही दिवस वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने रात्रीचे तापमान झपाट्याने वाढू लागले असून, शहराला नैसर्गिक थंडावा मिळेनासा झाला आहे.
झपाट्याने वाढणारे काँक्रीटीकरण, सिमेंट-काँक्रीट रस्त्यांचे जाळे, उंच इमारती, वाहनांमधून होणारे उष्णतेचे उत्सर्जन आणि गेल्या काही वर्षांत झालेली मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे दिवसभर साठलेली उष्णता रात्रीही वातावरणात टिकून राहते. त्यामुळे किमान तापमान सतत उंचावत असून, शहरात ‘अर्बन हीट आयलंड’चा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याची भीती पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केली.
किमान २८ अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी होणे ही हवामानातील नोंद नाही. त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर, मातीतील ओलाव्यावर, पक्षी व प्राण्यांच्या अधिवासावर तसेच मानवी आरोग्यावरही होत आहे. थंड हवा न मिळाल्याने झोपेची गुणवत्ता कमी होणे, हृदयविकार, मधुमेहींना अधिक त्रास होण्याची शक्यता वाढते.
ठाण्यातील वाढते किमान तापमान ही केवळ हवामानाची आकडेवारी नाही; ती शहराच्या हरवत चाललेल्या नैसर्गिक गारव्याची आणि पर्यावरणीय ऱ्हासाची स्पष्ट धोक्याची घंटा आहे. ठाण्याचे पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धन, खुल्या जागांचे संरक्षण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरणपूरक नगररचनेला प्राधान्य देणे ही आजची गरज आहे. यामुळे शहराचा विकासही शाश्वत आणि सुरक्षित होईल.
डॉ. प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक, ठाणे