ठाणे आगीच्या धगीवर; स्मार्ट सिटीची जबाबदारी केवळ २०९ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने ठाणे शहर आगीच्या धगीवर आहे.
ठाणे आगीच्या धगीवर;  स्मार्ट सिटीची जबाबदारी केवळ २०९ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त

ठाणे: स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने ठाणे शहर आगीच्या धगीवर आहे.

दररोज सरासरी तीन किंवा चार आगीच्या घटनांना सामोरे जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त असून २६ लाख ठाणेकरांच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दलाचा कारभार तूर्त रामभरोसे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन दलामध्ये ८३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, मात्र गेली अनेक वर्षे मंजूर पदांपैकी ६२६ पदे रिक्त असून केवळ २०९ अग्नीविरांनाच शहरातील आगीच्या घटनांसह आपत्तीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या ठाण्यात नवनवीन बहुमजली गृहसंकूले उभी राहत आहेत. त्यांना मुलभूत सुविधा पुरवत असताना ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक याप्रमाणे नऊ अग्निशमन केंद्रे आहेत. पण या अग्निशमन केंद्रामध्ये सध्या कर्मचाऱ्यांची वानवा आहे. विशेष म्हणजे या नऊपैकी एका केंद्रामध्ये केवळ एक क्यूआरटी वाहन ‘बेवारस’ ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे सर्वाधिक टोलेजंग इमारत असलेल्या घोडबंदर भागाची ही अवस्था आहे.

मंजुरी देऊनही पदे रिक्तच

शहरात एकीकडे टोलजंग इमारती उभ्या राहत असून लोकसंख्या २६ लाखांच्या घरात गेली आहे. अशावेळी मुख्य अग्निशमन दल अधिकाऱ्यासह ८३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असताना ही पदे मंजूर देखील करण्यात आली आहेत, मात्र त्यापैकी केवळ २०९ पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात पुढे असलेले फायरमनचे ४५० पैकी ३६० पदे रिक्त आहेत. म्हणजे फायरमनचे ८० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. शहरात कचऱ्याला आग लागण्यापासून मोठ्या घटना घडत आहेत. २२ जानेवारीला एकाच दिवशी १० ठिकाणी आगी लागल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी आगीच्या धुरात घुसमटून एका वृद्धाला जीव गमवावा लागल्याची घटनाही घडली होती.

पद भरतीसाठी दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रस्ताव पाठवत आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाकडे असणारे बळ अपूरे पडत असून मंजूर पदे भरण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. -गिरीष झळके, प्रमुख अग्निशमन दल

पदनाम मंजूर भरलेली रिक्त

मुख्य अधिकारी ०० ०० ०१

उपमुख्य अधिकारी ०१ ०१ ००

विभागीय अधिकारी १२ ०१ ११

केंद्र अधिकारी २१ १४ ०७

सह केंद्र अधिकारी ५६ ०६ ५०

लीडींग फायरमन ७० ६७ ०३

चालक, यंत्रचालक २२४ ३० १९४

फायरमन ४५० ९० ३६०

एकूण ८३५ २०९ ६२६

logo
marathi.freepressjournal.in