ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता; २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभव

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत कामगिरी करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. २७ जून रोजी पार पडलेल्या मतदानानंतर रविवारी (दि. २८ जून) मतमोजणी पूर्ण झाली आणि अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता;  २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभव
ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता; २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभवसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत कामगिरी करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. २७ जून रोजी पार पडलेल्या मतदानानंतर रविवारी (दि. २८ जून) मतमोजणी पूर्ण झाली आणि अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत सहकार पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले, तर परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.

या निवडणुकीत सहकार पॅनलला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ लाभले होते. पॅनलमध्ये ज्येष्ठ नेते किसन कथोरे, खासदार नरेश म्हस्के, कृषित ठाकूर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी होते. दुसरीकडे, परिवर्तन पॅनलमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बाबाजी पाटील तसेच भाजप आणि शिवसेनेशी संबंधित अनेक नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. मात्र, विविध राजकीय समीकरणे आणि जोरदार प्रचार करूनही परिवर्तन पॅनलला मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यश आले नाही. २१ पैकी १५ उमेदवार किसन कथोरे यांनी निवडून आणून ठाणे पालघर जिल्ह्यात आपली ताकत असल्याचे दाखवून दिले आहे

विशेष म्हणजे, संचालकपदाच्या नऊ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या मतदानात सहकार पॅनलने निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे ठाणे-पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात किसन कथोरे यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.

निकालाबाबत बँकेचे सभासद तसेच राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. निकाल जाहीर होताच सहकार पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या विजयामुळे ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सहकार पॅनलची पकड आणखी मजबूत झाली आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा आजही प्रभाव कायम

वसई : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आजही कायम असल्याचे निकालातून अधोरेखित झाले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची सत्ता कायम आहे. यंदाच्या निवडणुकीतही हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी प्रभावी प्रचारयंत्रणा उभी करत मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. त्याचा परिणाम सहकार पॅनलच्या दणदणीत विजयाच्या रूपाने दिसून आला.

हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी आखलेल्या प्रभावी प्रचार रणनीतीमुळे सहकार पॅनलने स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.सुनील भुसारा, अमित घोडा, निवृत्ती घुसेकर, बळीराम जाधव, दत्तू रड्या, मनीष पाटील, भाग्यश्री भोईर आणि नीता कांबळी यांनी विजय संपादन केला.

किसन कथोरे ठरले ‘किंगमेकर’

मुरबाड : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत यश मिळवत परिवर्तन पॅनलचा पराभव केला. या निकालानंतर भाजपचे आमदार किसन कथोरे हे या निवडणुकीतील 'किंगमेकर' ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही पॅनलमध्ये भाजपशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते असल्याने ही लढत विशेष चर्चेची ठरली. राजकीय वर्तुळात या निवडणुकीकडे भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात होते. अखेर सहकार पॅनलने २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले, तर परिवर्तन पॅनलला अपेक्षित यश मिळाले नाही.

जिल्हा बँक संचालकपदी ज्योती पटेकर यांची वर्णी

जव्हार : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जव्हारच्या ज्योती दिलीप पटेकर यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे जव्हारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीमुळे पटेकर कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

यापूर्वी दिलीप पटेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली होती, तर त्यांचे सुपुत्र नकुल पटेकर जव्हार नगरपालिकेत नगरसेवक आहेत. या निवडीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार हरिश्चंद्र भोये, खासदार डॉ. हेमंत सवरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे समर्थकांनी नमूद केले.

गृहनिर्माण क्षेत्रातील कार्य सुरूच राहणार

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे उमेदवार सिताराम राणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी मतदारांच्या कौलाचा आदर करत, गृहनिर्माण क्षेत्रातील आपले कार्य यापुढेही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला प्रत्येक उमेदवार विजयासाठीच प्रयत्न करत असतो. निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना राणे यांनी स्वयं-पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले.

ठाण्यासारख्या शहरात गृहनिर्माण हा कळीचा प्रश्न असताना विद्यमान संचालक मंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन वर्षांत या योजनेचे मोजकेच प्रस्ताव मंजूर झाले असून, बँक ही केवळ शेतकऱ्यांची नसून शहरी भागातील नागरीकरणाच्या गरजाही ओळखून संचालक मंडळाने सक्रिय होणे गरजेचे होते, अशी टीका त्यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in