ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे
ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे (Photo-X/@iravindraphatak)
Published on

ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात होती. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अभिजित पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे रवींद्र फाटक आणि अभिजित पवार यांच्यात अपेक्षित असलेली थेट लढत टळली आणि रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग खुला झाला. या मतदारसंघातून दिवंगत वसंत डावखरे सलग चार वेळा बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत रवींद्र फाटक यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड होत असल्याने ‘बिनविरोध निवडीचा ठाणे पॅटर्न’ चर्चेत आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार तसेच माझ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. आमचे संख्याबळ अधिक असल्याने विजय निश्चित होता. मात्र, विरोधकांनी माघार घेतल्याने त्यांचेही मी आभार मानतो.

रवींद्र फाटक (शिंदे सेना)

कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली जाते. मात्र, या निवडणुकीत संख्याबळ आमच्या बाजूने नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविण्यापेक्षा संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देत पक्ष विस्तारासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच कारणामुळे निवडणुकीतून माघार घेण्यात आली.

मनोज प्रधान, शहराध्यक्ष, शरद पवार गट

logo
marathi.freepressjournal.in