ठाणे-पालघर प्रवास होणार सुसाट; वाडा-मनोरसह चार रस्ते प्रकल्पांसाठी एमएमआरडीएचे ११०० कोटी

ठाणे ते पालघर प्रवास सुसाट होणार असून रस्ते मार्गाने पालघर गाठणे सोपे होणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे ते पालघर प्रवास सुसाट होणार असून रस्ते मार्गाने पालघर गाठणे सोपे होणार आहे. पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे. त्यानंतर लगेच एमएमआरडीएने पालघरमध्ये विकासकामे सुरू केली आहेत. याअंतर्गत एमएमआरडीएने पालघरमधील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी चार रस्ते प्रकल्प हाती घेतले असून ११०० कोटी रुपये खर्चाच्या कामांसाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

प्रकल्पांची संकल्पना आणि बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर असून ९ सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने ४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ७२० किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील १६३५ गावांच्या नियोजनाची जबाबदारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला दिली होती. यावरून टीका होताच त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

आता एमएमआरडीए विकास करणार असलेल्या क्षेत्रात पालघरमधील २१० गावे, वसई १३, पनवेल ९, खालापूर ३३, पेण ९१ आणि अलिबागमधील ९० गावांचा समावेश आहे.

प्रवास अतिवेगवान आणि सुकर होणार

वसई ते पालघर, नारिंगी खाडीपूल तीन किलोमीटर लांबीचा असून यासाठी ७४१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वसई-विरारहून पालघरला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तर मनोर-वाडा रस्ता आणि कंचाड फाटा-कुडूस रस्ता प्रकल्प ८९ कोटी रुपये खर्चाचा आहे. पालघर ते विरार-वैतरणा नदीपुलासाठी ९६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुरबे-पालघर खाडीपूल प्रकल्प १८१ कोटींचा आहे. या सर्व प्रकल्पांमुळे वसई, विरार, पालघरमधील प्रवास अतिवेगवान आणि सुकर होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in