

ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. या काळात पितरांचे तर्पण आणि श्राद्ध विधी करण्यासाठी घरातील मंडळींची लगबग सुरू होते. गणपतीच्या आगमनापूर्वीच मातृ-पितृ श्राद्धासाठी भटजी, जंगम आणि गुरव यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी संपर्क साधला जातो. मात्र, सध्या श्राद्ध आणि विविध धार्मिक विधींच्या दक्षिणेचे दर वाढल्याने सामान्य कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
भरणी श्राद्ध आणि पितृ श्राद्ध यांसारख्या विधींसाठी काही ठिकाणी दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत दक्षिणा आकारली जात असल्याचे सांगितले जाते. याशिवाय विधीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्चही दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विधीसाठी येणाऱ्या मंडळींच्या भोजनाचा खर्चही वाढला असून, प्रतिथाळी १०० ते २०० रुपये दर आकारला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे धार्मिक विधींचा एकूण खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे.
ठाण्यातील श्रीकौपीनेश्वर मंदिराच्या परिसरात मंगल विधीपासून उत्तरकार्य आणि श्राद्ध विधीपर्यंत विविध धार्मिक विधी सकाळपासून सुरू असतात. मंदिराच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी पार पडतात. या ब्राह्मण मंडळींची संघटनाही असून, तिच्यामार्फत विविध मांगलिक आणि धार्मिक विधींसाठी भटजी उपलब्ध करून दिले जातात. श्रीकौपीनेश्वर मंदिराच्या मागील बाजूस दररोज सुमारे १५ ते २० दशक्रिया विधी पार पडत असल्याचे सांगितले जाते. या विधींसाठी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीनुसार दक्षिणा घेण्याची परंपरा असल्याचेही सांगण्यात आले. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीकडून सुमारे तीन हजार रुपयांत विधी केला जातो, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत दक्षिणा घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
महागाईचा परिणाम धार्मिक विधींवरही
कोरोना काळात अनेक ब्राह्मणांनी धार्मिक विधी विनामूल्य किंवा वाजवी दरात करून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, सध्याच्या वाढत्या महागाईमुळे धार्मिक विधींच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वी साडेतीन ते चार हजार रुपयांत होणारा विधी आता पाच हजारांपासून दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत जात असल्याचे काही भटजींचे म्हणणे आहे. याबाबत श्रीहरी पुरुषोत्तम भट यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे ब्राह्मणांनाही मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी विधी करण्यासाठी भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागते. दिवसभर विविध ठिकाणी विधी करण्यासाठी खासगी किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे इंधन आणि वेळ दोन्ही खर्च होतात.
नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दक्षिणा घेत असतो. वाढत्या महागाईचा आम्हालाही फटका बसला आहे. धार्मिक विधी दिवसातून एखादाच मिळतो, तर कधी महिन्यातून दोन-चार विधी मिळतात. त्यातून कुटुंबाचा खर्च भागवणेही अनेकदा कठीण होते. तरीही ब्राह्मण म्हणून आपले कर्तव्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
श्रीहरी पुरुषोत्तम भट
जीवनावश्यक दरवाढीचा परिणाम धार्मिक विधींवरही झाला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात दर वाढवावे लागत आहेत. मात्र, एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास त्याच्या ऐपतीनुसार दक्षिणा घेऊन मंगलकार्य विधी तसेच पितृ श्राद्ध विधी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
भागवत गुरुजी, श्रीकौपीनेश्वर मंदिर