Thane : वाहन चोरी करणारे पाच जण अटकेत; २८ चारचाकी व दुचाकी हस्तगत; २६ गुन्हे उघडकीस

ठाणे शहर-ग्रामीण, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांच्या कल्याण व भिवंडी गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील २८ चारचाकी व दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांची किमत १७ लाख ९० हजार रुपये इतकी आहे.
Thane : वाहन चोरी करणारे पाच जण अटकेत; २८ चारचाकी व दुचाकी हस्तगत; २६ गुन्हे उघडकीस
Published on

ठाणे : ठाणे शहर-ग्रामीण, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांच्या कल्याण व भिवंडी गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील २८ चारचाकी व दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांची किमत १७ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. तसेच या टोळीने तब्बल २६ गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चारचाकी व दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने गुन्हे शाखांमार्फत समांतर तपास सुरू होता. गुप्त बातमीदारांच्या मदतीने व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी व कल्याण गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली.

कल्याण गुन्हे शाखेने पुणे, हडपसर-रामटेकडी येथून अतुल सुरेश खंडाळे (२४), जळगाव येथील शेखर गोवर्धन पवार (३०), कल्याण चक्कीनाका येथील आकाश मच्छिंद्र नसरगंध (२३), तसेच कल्याण-आंबिवली येथील गाझी लकीर हुसैन (१९) यांना अटक केली. तर भिवंडी गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोड परिसरातील मुश्ताक इस्तीयाक अन्सारी (३१) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अटक केलेल्या या पाच जणांकडून १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये किमतीची चारचाकी व दुचाकी जप्त करण्यात आली. एकूण २६ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, त्यापैकी १८ गुन्हे ठाणे शहर, ४ गुन्हे बृहन्मुंबई, ३ गुन्हे नवी मुंबई व १ गुन्हा ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय हद्दीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई भिवंडी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकांनी संयुक्तरित्या केली.

logo
marathi.freepressjournal.in