
ठाणे : इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी याचा सुरक्षितपणे वापर न केल्यास या गोष्टी किती घातक असू शकतात हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांमधून उघड झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यात ७१४ सायबर संदर्भातील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ३९ गुन्हे उघड करण्यात ठाणे पोलिसांना यश आले असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याही दावा ठाणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये शेअर ट्रेडिंग गुन्ह्यांची संख्या देखील मोठी आहे.
गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारांनी आपला उपद्रव वाढवला असून हे भामटे फसवणुकीच्या नवनवीन कल्पना अमलात आणून अनेक सर्वसामान्यांची फसवणूक घडवून आणत आहेत. सायबर गुन्हे करणाऱ्या भामट्यांनी अनेक लिंक, मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत व त्याद्वारे फसवणूक करीत आहेत. त्यातच शेयर ट्रेडिंग, डिजिटल अरेस्ट अशा सायबर फसवणुकीचा प्रकारात मोठी वाढ झाली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या ३५ पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात ७१४ सायबर क्राईमचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शेयर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे ११६, टास्क फ्रॉड ५८, कुरियर फ्रॉड २६, डिजिटल अरेस्ट ५० आणि इतर ४६९ सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यातून सायबर चोरट्यांनी नागरिकांची १६२ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. दरम्यान, सर्वाधिक फसवणूक शेयर ड्रेडिंग मधून करण्यात आली आहे. ऑनलाईन शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याची बतावणी करीत सायबर गुन्हेगारांनी ठाण्यातील अनेकांची फसवणूक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील केवळ ३९ गुन्हे उघड करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती
ठाणे पोलीस आयुक्तालयात सध्या सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन कार्यरत करण्यात आले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची उकल जलद गतीने होऊन सायबर गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसण्यास मदत होणार आहे असा दावा ठाणे पोलिसांकडून करण्यात येत असला तरी सायबर संदर्भात गुन्हा नोंद करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचा सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे.