

ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे हेच सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांसह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मीनाक्षी शिंदे यांनीच पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून कटकारस्थाने रचली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. जनतेमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून, समाजमाध्यमांचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा भावनिक आणि संवेदनशील परिस्थितीत विरोधक या कुटुंबाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला.
राजकीय स्वार्थासाठी या कुटुंबीयांच्या बाबतीत घातपात किंवा अन्य अनुचित प्रकार घडवून आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राम पूर्णेकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
काही विरोधी नेत्यांचे मुख्य आरोपींशी संबंध असल्याचे संकेत आणि माहिती समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले काही आरोपी दिसल्याचे त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर या प्रकरणाबाबत एकतर्फी माहिती पसरवली जात असून, विरोधकांच्या कथित संशयास्पद हालचालींमुळे त्यांच्या हेतूंबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांतील विरोधकांची वक्तव्ये पाहता, ठाणे शहराची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानेच आरोप केले जात असल्याचे दिसून येते, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या. या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होत असून, शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांत तणावपूर्ण प्रसंगही उद्भवल्याचा दावा त्यांनी केला. आपल्यावरही विविध प्रकारचे आरोप केले जात असून, त्याचा गैरफायदा घेऊन राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
संवेदनशील प्रकरणाचे राजकारण
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, प्रदीप पूर्णेकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करत आहेत. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे, उबाठा गटाचे केदार दिघे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे हे या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.