Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला दीड महिन्याहून अधिक काळ उलटूनही कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष सुरूच आहे. ‘आज बाळासाहेब हयात असते, तर त्याच रात्री आम्हाला न्याय मिळाला असता,’ अशा शब्दांत राम पूर्णेकर यांनी आपली व्यथा व्यक्त केली...
Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर
Published on: 

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला दीड महिन्याहून अधिक काळ उलटूनही कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष सुरूच आहे. तपासाच्या प्रगतीबाबत असमाधान व्यक्त करत प्रदीप यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर भावनिक साद घातली आहे. ‘आज बाळासाहेब हयात असते, तर त्याच रात्री आम्हाला न्याय मिळाला असता,’ अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.

वडिलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राम यांनी सोमवारी रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मोठा बॅनर लावला. ‘माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? आय बिलीव्ह इन कॉन्स्टिट्यूशन, जस्टिस फॉर प्रदीप पूर्णेकर’ असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. थेट पोलीस ठाण्याबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनरने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२९ सप्टेंबर रोजी मानपाडा येथील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी आणखी काही संबंधित व्यक्तींवर कारवाई होणे बाकी असल्याचा दावा पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे तपासाचा वेग आणि पोलिसांच्या कारवाईबाबत कुटुंबीयांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘गेल्या ४० दिवसांत बाळासाहेबांचे विचार नेमके कोणाकडे आहेत, हे मी पाहिले. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी त्याच रात्री आम्हाला न्याय मिळवून दिला असता. आज २६ वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहे, हेच दुर्दैवी चित्र आहे,’ अशा शब्दांत राम यांनी आपली खंत व्यक्त केली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करतानाही न्यायाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने मुंबईत जाऊन अभिवादन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायाच्या बॅनरशेजारी शिंदेंचा अभिवादन फलक

या प्रकरणात आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे. राम यांनी न्यायासाठी लावलेल्या बॅनरच्या अगदी शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना परिवाराच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करणारा फलक लावण्यात आला आहे. एका बाजूला वडिलांना न्याय मिळावा यासाठी मुलाची आर्त हाक, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांना अभिवादन करणारा सत्ताधारी शिवसेनेचा फलक, असे चित्र कापूरबावडी परिसरात पाहायला मिळत आहे. या दोन्ही बॅनरमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, राजकीय चर्चांपलीकडे प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची न्यायासाठीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)