Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक
Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक
Published on: 

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. निखिल यादव आणि नितेश पवार यांना मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाकडून विविध ठिकाणी तपास सुरू असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची कुटुंबीयांची मागणी

भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी हत्येचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून द्यावी, अशी विनंती आमदारांकडे केली. संकटाच्या काळात पक्षभेद बाजूला ठेवून कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रतिपादन केले. पूर्णेकर हत्या प्रकरणात सध्या पोलीस तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुरावे नसताना आरोप करू नका-मीनाक्षी शिंदे

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांबाबत भूमिका स्पष्ट केली. पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू नयेत. पोलिसांचा तपास सुरू असून सत्य तपासातून समोर येईल. पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ एखाद्यासोबतचा फोटो किंवा संपर्क असल्याने गुन्हेगारी संबंध सिद्ध होत नाहीत, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या काही क्लिपच्या सत्यतेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आपले नाव पुरवणी एफआयआरमध्ये असल्याच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने केले जात असल्याचे त्यांनी म्हटले असून, तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नये, असे आवाहन केले.

‘आरोपी कोणताही असो, पाठीशी घालणार नाही’

खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्णेकर हत्या ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली. मात्र, या घटनेच्या आधारे राजकीय आरोप-प्रत्यारोप करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस तपास सुरू असून, मीनाक्षी शिंदे यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. आरोपी कोणताही असो, त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे म्हस्के यांनी सांगितले. एफआयआरमधील नावांवरून वेगवेगळ्या प्रकरणांत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप प्रसारित करण्याऐवजी पोलिसांना तपास करू द्यावा.

जीव घेणारा संघर्ष नको

प्रदीप पूर्णेकर हे कोणत्या पक्षाचे होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी गंभीर बाबी मांडल्या आहे. या प्रकरणात अनेकांना अटक झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष दिले आहे. तपासातून सत्य समोर येऊन दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नाईक यांनी राजकीय संघर्ष हा राजकीय पातळीवरच असावा, तो जीव घेणारा नसावा, असे स्पष्ट केले. या प्रकरणामागे सूत्रधार असल्यास त्यालाही कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in