Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू

मानपाडा परिसरातील गणेशनगर चर्चजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू यशवंत पूर्णेकर (३७) यांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात त्यांचा मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू
Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू
Published on: 

ठाणे : मानपाडा परिसरातील गणेशनगर चर्चजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू यशवंत पूर्णेकर (३७) यांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात त्यांचा मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयात हल्ला झाला होता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पप्या शिंदे, संतोष ऊर्फ टल्ली कनोजिया, निखिल यादव ऊर्फ शुटर यादव, चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेला एक इसम आणि हेल्मेटधारी अज्ञात व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात शुकशुकाट; पोलीस ठाण्यावर मोर्चा

हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मानपाडा, मनोरमानगर आणि गणेशनगर परिसरातील काही दुकाने व शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे परिसरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला. पूर्णेकर यांच्या अंत्ययात्रेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करणारे फलकही लावण्यात आले होते. पूर्णेकर यांच्या नातेवाईक आणि समर्थकांनी बुधवारी मानपाडा-गणेशनगर येथून कापूरबावडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचीही चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. ही मागणी आणि त्यासंदर्भातील आरोप तपासाचा भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू
ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

‘एफआयआरमध्ये दोघांची नावे येईपर्यंत शांत बसणार नाही’

आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत, दोघांची नावे येईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला. राऊत यांनी या हत्येमागे मोठे सूत्रधार असल्याचा आरोप करत पोलिसांनी कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयाचीही चौकशी करावी, अशी मागणी केली. आदित्य ठाकरे यांनीही ठाण्यात अशा प्रकारची हत्या होणे गंभीर असल्याचे सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध बाजूंनी तपास सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी ९ ते १० पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबार आणि धारदार शस्त्राच्या वापराबाबतही तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि जखमांचे स्वरूप स्पष्ट होईल.

डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सहपोलीस आयुक्त

logo
marathi.freepressjournal.in