शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

महापालिकेने थकीत मालमत्ता कर तसेच चालू वर्षाचा कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दंडावर ९० टक्के सूट देण्याची विशेष योजना जाहीर केली होती.
शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर
शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर
Published on

ठाणे : महापालिकेने थकीत मालमत्ता कर तसेच चालू वर्षाचा कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दंडावर ९० टक्के सूट देण्याची विशेष योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार, करदात्यांनी मूळ करासोबत केवळ १० टक्के दंड भरल्यास उर्वरित ९० टक्के शास्ती माफ करण्यात येत आहे. या योजनेला ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, निवासी करदात्यांसाठी लागू करण्यात आलेल्या या दंडमाफी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २५ मार्च या मुदतवाढीपूर्वीच्या शेवटच्या दिवशीच मालमत्ता कर विभागाने तब्बल १३.५० कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महासभेत दिलेल्या निर्देशानुसार, २५ मार्चला संपणारी ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला ही सवलत योजना १२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत लागू करण्यात आली होती. या कालावधीत पालिकेच्या तिजोरीत एकूण ५७ कोटी रुपयांची भर पडली, तर केवळ २५ मार्च या एका दिवसातच १३.५० कोटींची वसुली झाली. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा ९२० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जानेवारी अखेरपर्यंत ५६५ कोटी रुपये जमा झाले होते, तर फेब्रुवारी अखेर ही रक्कम ६३० कोटींवर पोहोचली होती. सवलत योजना लागू झाल्यानंतर वसुलीत आणखी वाढ होऊन २५ मार्च अखेर एकूण ७६० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सुट्टीच्या दिवशी करवसुली केंद्र सुरू

अद्याप कर न भरलेल्या मालमत्ताधारकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, फेब्रुवारी व मार्च महिन्यातील सर्व शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत, तसेच रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत करवसुली केंद्रे व मुख्य कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in