ठाणे रेल्वे स्टेशन बसस्थानक रामभरोसे! कार्यशाळेची इमारतही धोकादायक स्थितीत; प्रवासी मेटाकुटीला

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची नाराजी, ठाणे रेल्वे स्टेशनजवळ असलेले अतिशय वर्दळीचे ठाणे रेल्वे स्टेशन बसस्थानक अतिशय धोकादायक स्थितीत
ठाणे रेल्वे स्टेशन बसस्थानक रामभरोसे! कार्यशाळेची इमारतही धोकादायक स्थितीत; प्रवासी मेटाकुटीला

अतुल जाधव / ठाणे

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची नाराजी असून ठाणे एसटी बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किमान मूलभूत सुविधा तरी द्या, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी करणारे एसटी कर्मचारीच कार्यशाळेत सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ असलेले अतिशय वर्दळीचे ठाणे रेल्वे स्टेशन बसस्थानक अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची अवस्था अत्यंत ‌खराब झाल्याने कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होण्याची शक्यता प्रवाशांनी वर्तवली आहे. स्थानकाचे सुशोभीकरण तसेच काँक्रीटीकरण बरेच वर्ष करण्यात आले नसल्याने स्थानकाच्या आतील भागात मोठ मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात माती, पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून बसस्थानकाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. संपूर्ण स्थानकात घाणीचे साम्राज्य असल्याने सततच्या दुर्गंधीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.

ठाणे शहरात असलेल्या महामंडळाच्या तीन आगारापैकी ठाणे रेल्वेस्थानकाजवळ असलेले ठाणे रेल्वे स्टेशन बसस्थानक महत्त्वाचे आगार असून या स्थानकात प्राथमिक सुविधांची देखील बोंब आहे. ठाणे बसस्थानकातून बोरिवली, भिवंडी, पनवेल, पालघर, बोईसर, डहाणू, विरार-वसई, नालासोपारा, जव्हार, वाडा या ठिकाणी जाण्यासाठी बसेस सुटतात. या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी आपला पल्ला गाठण्यासाठी याच बसस्थानकाचा वापर करत असतात.

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाला प्रवाशांसाठी साधे पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागतो. बसस्थानकाच्या आवारात होर्डिंगची संख्या लक्षणीय आहे. त्यातील अनेक होर्डिंग जुने झाले असल्याने अनेकांना गंज पकडला आहे. होर्डिंगच्या कमानी केव्हाही कोसळतील अशी भीती येथील प्रवाशांनी व्यक्त केली आहे. बसस्थानक रेल्वे स्थानकाबाहेर अतिशय मोक्याच्या जागेवर असल्याने या परिसरात फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचप्रमाणे बसस्थानकाला कोणत्याही प्रकारचे कुंपण अथवा प्रवेशद्वार नसल्याने रिक्षाचालकांचा मोठ्या प्रमाणात मुक्त वावर असतो.

बसस्थानक नसून समस्यांचे आगार

बसस्थानक जीर्ण झाल्याने या ठिकाणी ड्रेनेजची अवस्था बिकट झाली आहे. स्थानकात असलेल्या कॅन्टीनचे सांडपाणी अनेकदा रस्त्यावर पसरते. स्थानकात असलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप येते. स्थानकात एका कोपऱ्यात असलेल्या सुलभ शौचालयाचे सफाई केल्यानंतरचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरते. भिवंडीकडे जाणाऱ्या बसेसचा थांबा शौचालयाच्या बाहेर असल्याने त्या प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास होतो. ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर असलेले हे बसस्थानक एखाद्या पडिक वास्तूप्रमाणे असल्यामुळे अनेकवेळा हे बसस्थानक असल्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

महिला प्रवाशांची गैरसोय

बसस्थानकात हिरकणी कक्ष, स्तनपान कक्ष आहेत, मात्र ते कायम बंद अवस्थेत असल्याने महिला प्रवाशांना त्याचा कोणताच फायदा होत नाही. स्थानकात महिलांसाठी असुरक्षित वातावरण आहे. बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्क केलेल्या असतात, तर परिसरात भिकारी, वारांगना यांचा मुक्त वावर असल्यामुळे महिलांना अडचणीचे ठरत आहे. त्याचबरोबर या बसस्थानकात कोणती बस कोणत्या थांब्यावरून सुटेल याची माहिती देण्यासाठी चौकशी कक्ष नसल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण

कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे ४०० लोकांचे काम १०० कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले होते. कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आलेले आहे. भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते, तसेच शौचालय, स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचेही पाहणीत दिसून आले.

"मनुष्यबळाची कमतरता असून ४०० कर्मचाऱ्यांची कामे फक्त १०० कर्मचारी करत आहेत. तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत. एकूणच कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागले आहे. काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही. कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत आहेत." - संजय केळकर, आमदार

logo
marathi.freepressjournal.in