

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक ५ आणि ६ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांचे (एस्केलेटर) उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जिन्यांच्या जागेचे नियोजन योग्य नसल्याने मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांना त्यांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उभारलेली सुविधाच काही प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ हे अत्यंत वर्दळीचे फलाट आहेत. या फलाटांवरून डोंबिवली, कल्याण, कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलची वाहतूक होते. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही येथे थांबा असतो. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या दोन्ही फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. लोकलमधून उतरणारे आणि गाडी पकडण्यासाठी धावणारे प्रवासी एकाच वेळी समोरासमोर येत असल्याने जिने आणि पादचारी पुलांजवळ गर्दीचा ताण वाढतो.
मात्र, नव्याने उभारलेल्या सरकत्या जिन्यांची जागा मुंबईहून येणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांसाठी सोयीची नाही. या लोकल सरकत्या जिन्यांच्या तुलनेत सुमारे तीन डबे पुढे जाऊन थांबतात. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून उतरल्यावर जिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी फलाटावरून अतिरिक्त अंतर चालावे लागते. गर्दीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवाशांमधून वाट काढताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः गैरसोय होते.
एका दिशेच्या प्रवाशांनाच अधिक फायदा
दुसरीकडे, कल्याण, कर्जत आणि कसारा दिशेकडून ठाणे स्थानकात येणाऱ्या जलद लोकलमधील प्रवाशांसाठी हे सरकते जिने अधिक सोयीचे ठरत आहेत. या लोकलचे पहिले डबे जिन्यांच्या जवळ थांबत असल्याने प्रवाशांना उतरल्यावर लगेच त्यांचा वापर करता येतो. तसेच १५ डब्यांच्या लोकलचा शेवटचा डबाही सरकत्या जिन्यांच्या जवळ येत असल्याने त्या प्रवाशांनाही त्याचा लाभ मिळतो. मात्र, मुंबईहून येणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
नियोजनात बदल करण्याची मागणी
सरकत्या जिन्यांचा वापर करून पादचारी पुलावर पोहोचल्यानंतरही काही प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या पुलाचा किंवा जिन्याचा मार्ग घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांची अतिरिक्त पायपीट होते. परिणामी, प्रवास सुलभ करण्याऐवजी काही ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलच्या थांबण्याच्या ठिकाणांचा आणि प्रवाशांच्या हालचालींचा अभ्यास करून सरकत्या जिन्यांच्या नियोजनात आवश्यक बदल करावेत. तसेच फलाटांवर अतिरिक्त सरकते जिने उभारण्याचा विचार करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.