ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीचे प्रमाण वाढते; चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातून उपनगरीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि रेल्वेला वर्षाला हजारो कोटी रूपयांचा महसूल मिळवून देतात
ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीचे प्रमाण वाढते; चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात रेल्वेच्या सुविधा आणि लोकल ट्रेन यांच्यात वाढ होताना दिसत नाही. त्यातच गेल्या काही दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलची संख्या कमी करून एसी लोकल वाढण्यात येत असल्याने रेल्वेगाड्याच नव्हे, तर रेल्वे स्टेशनही ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. ठाणे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून भयावह परिस्थिती असून चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातून उपनगरीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि रेल्वेला वर्षाला हजारो कोटी रूपयांचा महसूल मिळवून देतात; मात्र या प्रवाशांच्या नशिबी सुखकारक प्रवास कधी येत नाही. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी काही विशेष सुविधा देण्यात येतील, रेल्वे लोकलमधे वाढ होईल, असे अपेक्षित होते; परंतू भाजप प्रणित सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळातही रेल्वे बजेट मधेही उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी फारसे काही मिळालेले अद्याप तरी दिसलेले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबई, कर्जत-कसारा, नवी मुंबई आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी किमान मागील दहा वर्षांत तरी नव्याने कोणतीही हालचाल झालेली नाही. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील अतिरिक्त वाढणारा भार कमी करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प कळवा-ऐरोली एलिव्हेटेड या रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची गती वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सांगितले. त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता हा प्रकल्प खूपच महत्वाचा आहे.

कल्याण, कर्जत, कसारा मार्गांवरील लाखो प्रवाशांना वाशी, पनवेलकडे प्रवास करायचा असल्यास ठाणे स्थानकात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातो. यावर मार्ग काढण्यासाठी कळवा-ऐरोली एलिव्हेटेड हा मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे; मात्र सुरुवातीला या प्रकल्पात बाधित होणाऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वादात दिरंगाई झाली, तर आता पुनर्वसनाचा निर्णय झाला असला, तरी काम काही पुढे सरकलेले दिसत नाही. रेल्वे लोकलमध्ये नागरीकरणाच्या प्रमाणात जशी गर्दी वाढू लागली आहे. त्याच प्रमाणात अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर दर दिवशी किमान ८ ते १० प्रवाशांचे बळी जात असल्याचे उघड झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in