
ठाणे : पावसाळ्यात अचानक घडणाऱ्या आपत्तीत त्वरित संपर्क साधण्यासाठी पालिका यंदा नागरिकांची मदत घेणार असून व्हॉट्सॲप ग्रुपच्या मदतीने संपर्क यंत्रणा तयार करणार आहे.
पावसाळ्यात ठाणे शहरात अनेक सखल भागात पाणी साचते. पावसाचा जोर वाढला तर परिसर जलमय होतो. अशा प्रकाराच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ज्या ज्या प्रमुख सखल भागात पाणी साचते, त्याठिकाणी २४ तासांसाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. परंतु यापुढेही जाऊन तेथील नागरिकांचा सहभाग देखील घेण्याचे पालिकेने निश्चित केले असून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि तेथील नागरिक यांचा एका व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तेथील नागरिक देखील पाणी साचल्याचे व्हिडीओ किंवा फोटो महापालिकेला थेट पाठवू शकणार आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत १४ ठिकाणी अशी आहेत, की त्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असते. परंतु मागील वर्षापासून याठिकाणी महापालिकेने पाणी खेचण्यासाठी पंप बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यंदा देखील या ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. परंतु त्याठिकाणी एक सुरक्षा चौकी देखील उभारण्यात आली आहे. याठिकाणी तीन शिफ्ट मध्ये कर्मचारी तैनात करण्यात आला असून त्याच्या माध्यमातून पंप सुरू आहेत, किंवा बंद पडले आहेत, याची चाचपणी केली जात आहे.
तसेच याठिकाणी असलेल्या स्थानिक नागरीकांचा सहभाग देखील यात घेण्यात आला आहे. येथील स्थानिकांचे मोबाइल क्रमांक महापालिकेने घेतले असून त्यांचे क्रमांक महापालिकेच्या व्हॉट्सग्रुपवर जोडण्यात आले आहेत. त्यानुसार एखाद्या वेळेस पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला, पंप बंद पडला किंवा पाणी साचल्यास त्याची वर्दी आता स्थानिकांना देखील तत्काळ या माध्यमातून देता येणार आहे.
९४ शाळांत तात्पुरता आसरा
नऊ प्रभाग समिती अंतर्गत ९४ शाळांमध्ये पावसाळ्यात एखाद्यावेळेस काही हानी झाल्यास इमारत रिकामी करावी लागल्यास अशा लोकांना तात्पुरत्या स्वरूपात शाळांमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
८ नाल्यांवर बसविले सेन्सर
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख असलेल्या आठ नाल्यांच्या ठिकाणी सेन्सर बसविले आहेत. या सेन्सरच्या माध्यमातून नाल्यातील पाण्याची पातळी किती वर आली आहे, धोकादायक स्थिती आली आहे का? याची वर्दी या सेन्सरच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यानुसार वृंदावन, ठाणे कॉलेज, साकेत, मुंब्रा स्मशानभूमी नाला, गायमुख, हिरानंदानी इस्टेट आणि आणखी दोन नाल्यांचा यात समावेश आहे.