

ठाणे : उबाठाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असून, गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा राम पूर्णेकर यांनी दिला. हत्येमागील मूळ सूत्रधारांवर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि सीआयडीमार्फत करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर गेल्या पंधरा दिवसांपासून न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला साथ देणाऱ्या सर्वांचे राम पूर्णेकर यांनी आभार मानले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसे नेते अविनाश जाधव, आगरी समाजबांधव आणि विविध आगरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. पत्रकारांनी या प्रकरणाला व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे हा विषय घराघरांत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
पाचव्या आरोपीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात अटक केलेल्या पाचव्या आरोपीच्या शरीरयष्टीवरून आणि देहबोलीवरून तो सीसीटीव्हीतील हेल्मेटधारी व्यक्ती असल्याचे वाटत नसल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संशयितांची भूमिका आणि हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. मीनाक्षी शिंदे यांच्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत राजीनामा किंवा पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.