रेंटल हाऊसिंगमधील भाडे थकवणाऱ्यांवर कारवाई; ७२ जणांना नोटीस, महापालिकेची कडक भूमिका

ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने रेंटल हाऊसिंगमधील भाडे थकवणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, शहरातील ७२ रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
TMC
TMC
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने रेंटल हाऊसिंगमधील भाडे थकवणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, शहरातील ७२ रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतरही भाडे न भरल्यास संबंधित सदनिकांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

ठाणे महापालिकेने शहरातील विविध भागांत एकूण ११ ठिकाणी रेंटल हाऊसिंग इमारती उभारल्या असून त्यामध्ये सुमारे ३,५०० सदनिका आहेत. या घरांमध्ये मुख्यत्वे रस्ते रुंदीकरण, धोकादायक इमारतींचे पुनर्वसन, तसेच सार्वजनिक प्रकल्पांमुळे घरच्याबाहेर पडलेल्या नागरिकांना नाममात्र २ हजार रुपयांच्या भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, काही लाभार्थ्यांनी हे भाडेदेखील महिनोन‌्महिने भरलेले नाही, ही बाब गंभीर स्वरूपात समोर आली आहे.

महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही अनेकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता याविरोधात थेट कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत नौपाडा प्रभाग समिती हद्दीतील २२ आणि वर्तक नगर प्रभागातील ५० रहिवाशांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये काहींना थेट घरी जाऊन नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या रहिवाशांकडून आता भाडे वसूल होणार नाही, त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची आणि त्या घरातून हकालपट्टी करण्याची कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ही घरे शासकीय पुनर्वसनाच्या उद्देशाने दिली गेली असून, नागरिकांनी त्यांच्या कर्तव्याचा विसर न ठेवता वेळेवर भाडे भरावे, अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय, भविष्यात भाडे न भरणाऱ्या इतर रहिवाशांवरही अशीच कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

१६ जुलैपासून कडक कारवाई

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार, १६ जुलैपासून ही मोहीम अधिक वेगाने राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही घरे नाममात्र दराने दिली गेली असूनही, वर्षानुवर्षे भाडे न भरता काहीजण याचा गैरवापर करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरे मिळण्यात अडचण निर्माण होत असून, महापालिकेच्या निधीचा अपव्यय होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in