ठाणे : ठाणेकरांवर आता दुहेरी करवाढीचा बोजा पडणार आहे. सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करात १२ टक्के वाढीसह बिगर निवासी मालमत्ता करात २० टक्के, विकास प्रस्तावांतर्गत विकसित झालेल्या अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनाने ग्राह्य धरलेल्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. शिवाय पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांवर सहा महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबविण्याचा प्रस्ताव तयार केला होता त्याला देखील महासभेने मंजुरी दिली आहे. ठाणेकरांवर तब्बल १० वर्षांनंतर करवाढीचा बोजा पडणार आहे.
सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचे समर्थन करतांना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आलेला नाही, त्याला कर लावण्यासाठी काय काय प्रयत्न झाले याचा उहापोह केला. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
घर खरेदी-विक्रीही महागणार
मालमत्ता हस्तांतरण शुल्कात प्रस्तावित बदल अधिक गंभीर आहे. क्षेत्रफळावर आधारित शुल्काऐवजी शासनाच्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. महागड्या मालमत्तांच्या व्यवहारात यामुळे थेट लाखो रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. अनधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात तर तीनपट वाढ सुचवण्यात आली आहे.
घोडबंदर पट्ट्यात पेड पार्किंगचा प्रयोग
प्रायोगिक तत्त्वावर पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एनक्लेव्ह टीसीएस, निसर्ग तपोवन ते ऋतु इस्टेट, वाघबीळ जंक्शन ते भूमीएकर ब्रह्मांड फेज-८, ब्रह्मांड-पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्याला देखील महासभेने मंजुरी दिली आहे. या रस्त्यांवर सुमारे १,८०० पार्किंग लॉट उभारण्याचे नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी ४६५, तीनचाकींसाठी १००, कारसाठी १,११५ आणि बस-ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी ८३ लॉट प्रस्तावित आहेत.
अशी असेल मालमत्ता करवाढ
मालमत्ता करात करवाढ सुचविताना निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तांच्या करात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यातून महापालिकेला सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरण्यात आले आहे.
असे असणार पार्किंग दर
दुचाकी : पहिले २ तास - १० रुपये
तीनचाकी : पहिले २ तास - १०
कार : पहिले २ तास - १५
बस/ट्रक : पहिले २ तास - ८०