पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका ठाणेकरांना बसला आहे.
पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका ठाणेकरांना बसला आहे. २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही शहरातील अनेक भागांत सोमवारी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

अनेक सोसायट्यांना दैनंदिन वापरासाठी टँकर मागविण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांच्या खिशावरही अतिरिक्त भार पडला. त्यातच घोडबंदर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली.

ठाणे महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अमृत २.० योजनेंतर्गत वाढीव क्षमतेची पाणी उपसा करणारी यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले होते.

या कामासाठी शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. पाणीबंदची पूर्वसूचना देत नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहनही केले होते.

नियोजित २४ तासांत काम पूर्ण झाले नाही. कामाला दोन तासांचा विलंब झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, सुरुवातीला कमी दाबाने पाणी सोडण्यात आल्याने पाणीपुरवठ्याचे पुढील वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी रविवारनंतर सोमवारीही शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही.

घोडबंदर, वागळे इस्टेटला फटका

घोडबंदर रोड, वागळे इस्टेटसह ठाणे शहरातील भागांत अपुरा पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने रहिवाशांना पाण्याचे नियोजन करणे कठीण झाले. दैनंदिन वापरासाठी अनेक सोसायट्यांना टँकर मागवावे लागले. इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावकरनगर, लोकमान्यनगर पाडा, चैतन्यनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, येऊर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ आणि मुंब्रा रेतीबंदर आदी भागांनाही पाणीबंदचा फटका बसला.

पाण्याच्या उपलब्धतेवर कायमस्वरूपी तोडगा कधी?

घोडबंदर परिसरात पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असल्याने रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम करण्याबरोबरच वाढत्या मागणीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वीजपुरवठ्याच्या लपंडावानेही भर

पाणी टंचाईच्या संकटातून जात असतानाच घोडबंदर परिसरातील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठ्याच्या लपंडावालाही सामोरे जावे लागले. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली. त्यातच वातावरणातील उकाडा वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका अधिक जाणवला. विद्युत वाहिनीतील तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. संबंधित बिघाड दूर करण्यात आला असून, वीजपुरवठ्याची समस्या आता सुरळीत झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in