

ठाणे : ठाण्यात आता रिंग मेट्रो मार्गाच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांचा बळी देण्यात येणार असल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा दावा केला जात असला तरीदेखील मागील वर्षभरात शहरातील विविध ठिकाणी हजारो वृक्षतोडीला परवानगीदेखील देण्यात आली आहे. एकीकडे सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना या ठिकाणी आड येणाऱ्या शेकडो वृक्षांची तोड करण्यात येऊन घोडबंदर रोड उजाड करण्यात आला आहे. आता अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या सुमारे ३ हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील जाहीर सूचना ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केली आहे. या वृक्षतोडीला ठाण्यातील वृक्षप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे.
महापालिकेने मागवल्या हरकती सूचना
ठाणे महापालिकेने या संदर्भात हरकती सूचना मागवल्या असून अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पात ३२२४ वृक्ष बाधित होणार आहेत. यात २६९३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून ५१९ वृक्ष तोडण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशविदेशी झाडांची होणार कत्तल
आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून ज्या ज्या ठिकाणचे वृक्ष बाधित होणार आहेत, त्या ठिकाणी महापालिकेने सूचना लावलेली असून वृक्षांना क्रमांकदेखील देण्यात आला आहे. यात उपवन तलावाजवळ असलेली वृक्षसंपदा जवळ जवळ नष्ट होणार आहे तसेच वागळे इस्टेट सर्कल, रायलादेवी, लोकमान्य, शिवाईनगर इत्यादींसह या भागातील वृक्षांचा त्यात समावेश आहे. यामध्ये फॉक्सटेल पाम या वृक्षासह जांभुळ, सप्तपर्णी, बदाम, कडंब, सोनमोहर, पिंपळ, गुलमोहर, करंज, आंबा, शेवगा, नारळ, पेरू, वड, काळा उंबर, रामफळ यांसह विदेशी प्रजातींच्या झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे.
रिंग मेट्रो, २२ स्थानके, १२ हजार २०० कोटींचा प्रकल्प
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम ठाण्यात सुरू झाले आहे. २०२९ पर्यंत ही मेट्रो प्रवासी सेवेत दाखल होईल, अशी माहिती संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी २९ किलोमीटर असून त्यापैकी २६ किलोमीटर उन्नत आणि ३ किलोमीटर भूमिगत मार्ग असेल. या मार्गावर एकूण २२ स्थानके असतील, त्यापैकी दोन स्थानके भूमिगत असतील. यातील एक स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाशी थेट जोडले जाणार आहे. दररोज अंदाजे ७.६१ लाख प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेड (महा मेट्रो) मार्फत राबवला जाणार असून १२,२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्र सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर केला आहे.
अशी धावणार मेट्रो
रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाजीनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुमपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे अशी स्थानकांची आखणी करण्यात आली आहे तसेच शहरातील १३२ इमारतींच्या खालून ही मेट्रो जाणार आहे.