
गिरीश चित्रे / मुंबई
केंद्र व राज्य मंत्रिमंडळाने ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता प्रकल्पामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शास्त्रज्ञ नागरिक, कामगार संघटना, शैक्षणिक संस्था आदींनी चर्चा करत परिणामाचा अभ्यास करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल काॅपोरेशनच्या टिमने सर्वेक्षणाला सुरुवात केली असून संबंधितांनी सर्वेक्षण टीमला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र मेट्रो रेल काॅपोॅरेशन लिमिटेडच्या संचालकांनी (प्रकल्प) केले आहे.
आडव्या उभ्या मुंबई व परिसराचा विकास त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबईसह ठाणेकरांना वेगवान आणि सुलभ प्रवासाचा लाभ व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी रिंगण मेट्रोची आखणी करण्यात आली आहे. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून शहरातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. ठाणे रिंगण मेट्रोच्या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे. १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. परंतु हा प्रकल्प राबवत असताना येणारे अडथळे, परिणाम याचा अभ्यास करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल काॅपोॅरेशन लिमिटेडने घेतला आहे. यासाठी मेट्रो रेल काॅपोॅरेशनच्या टीमने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यात विविध घटकांशी संवाद साधणार असून टीमला सहकार्य करावे, असे आवाहन काॅपोॅरेशन केले आहे.
...असा राबवणार प्रकल्प
२९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग उन्नत असून, तीन किमीचा मार्ग भूमिगत आहे. प्रकल्पांतर्गत एकूण २२ स्थानके असून, त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.
संवाद साधणार, चर्चा करणार
प्रकल्पग्रस्त लोक, सरकारी विभाग, नागरिक, रहिवासी कल्याण संघटनेचे प्रतिनिधी, कामगार संघटना, बाजार प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संस्था आदींसह प्रकल्पातील भागधारकांशी संवाद साधणार आहे.