

फरियाल सय्यद/ठाणे : मुंबईला लागून असलेले ठाणे आता मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत सार्वजनिक प्रवासाची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळे ठाण्यात २९ किमीचा रिंग रोड मेट्रो मार्गिका तयार करण्यात येणार आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांचा प्रवास सुखकारक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाण्यात राज्य परिवहन बस, लोकल ट्रेन तसेच प्रस्तावित मुंबई मेट्रो मार्गांच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबईशी चांगला संपर्क आहे. शहरात रस्त्यांद्वारे कार, टॅक्सी आणि सार्वजनिक बसने चांगली जोडणी आहे. तरीही ठाण्यासाठी ही व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे ठाण्यात २९ किमीचा अंतर्गत रिंग मेट्रो मार्ग तयार होणार आहे.
२०२४ मध्ये दिली मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्पास ऑगस्ट २०२४ मध्ये मंजुरी दिली.
२९ किमी मार्ग, २२ स्थानके
२९ किमीचा हा मेट्रो मार्ग ठाणे रेल्वे जंक्शनपासून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपणारा एक रिंग स्वरूपाचा कॉरिडॉर असेल. यात वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबिळ, बालकुम, कोलशेत, साकेत, डोंगरीपाडा, नवपाडा, हिरानंदानी इस्टेट अशा महत्त्वाच्या निवासी व व्यावसायिक भागांना जोडले जाईल. या मार्गावर एकूण २२ स्थानके असतील. त्यापैकी २० उन्नत (एलीवेटेड) आणि २ भूमिगत असतील. ज्यात जुने व नवे ठाणे रेल्वे स्थानक समाविष्ट आहेत.
उंच मेट्रो स्थानके डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नागरी, वाघबिळ आणि वॉटरफ्रंट येथे असतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो : प्रवाशांना होणारे फायदे
ठाणे शहरातील प्रवासासाठी उच्च क्षमतेचा, जलद वाहतुकीचा पर्याय मिळणार.
प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार.
निवासी वस्त्यांना व्यावसायिक परिसरांशी थेट जोडणी.
मुंबई मेट्रो लाईन ४ आणि लाईन ५ या विद्यमान आणि आगामी नेटवर्कशी जोडणी होणार.
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार.
रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी झाल्याने प्रदूषणात घट .
कनेक्टिव्हिटी आणि इंटरचेंज
मुंबई मेट्रो लाईन 4 - रायला देवी आणि डोंगरीपाडा
मुंबई मेट्रो लाईन 5 - बलकूम नाका
बस - लोकमान्य नगर बस डेपो
रेल्वे - ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे स्थानक