ठाणे रिंग रोड मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील! १२ हजार कोटी रुपये खर्च; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी,पुणे मेट्रोचा स्वारगेट ते कात्रज विस्तार प्रकल्पही मार्गी
नवी दिल्ली : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे अंतर्गत रिंग रोड मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प १२,२०० कोटी रुपयांचा आहे. तसेच पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज विस्तार प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. हा मार्ग ५.४६ किमीचा असून त्याठी २९५४.५३ कोटी रुपये खर्च आहे. हा मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना दिलेल्या मंजुरीची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्रीय मंडळाने ३४ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात तीन मेट्रो प्रकल्प व दोन विमानतळांचे प्रकल्प आहे.
ठाण्यातील रिंग रोड मेट्रो प्रकल्प २९ किमीचा असून त्यात शहरातील २२ स्थानके असतील. या मेट्रोमुळे वाहतूक कोंडी दूर होऊन शहरातील प्रवास सुरळीत होऊ शकेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल. या प्रकल्पात केंद्र व राज्य सरकारची सम प्रमाणात भागीदारी असेल. तसेच विविध संस्थांकडून निधी उभारणी केली जाईल. तसेच विविध पद्धतीने या प्रकल्पासाठी पैसे उभारले जातील.
बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प-३ मध्ये दोन मार्गिकांना मंजुरी दिली आहे. त्यात मार्गिका एकमध्ये जे.पी. नगर ते केम्पपुरा या ३२.१५ किमीचा समावेश आहे. यात २१ स्थानके असतील. मार्गिका दोनमध्ये होसाहल्ली ते कदंबगेरे या १२.५० किमीचा समावेश आहे. यात ९ स्थानके असतील. या दोन्ही मार्गिकांना १५,६११ कोटी रुपये खर्च आहे.
प. बंगालमध्ये बागडोगरा विमानतळाचा विकास केला जाणार आहे. त्याला १५४९ कोटी रुपये खर्च आहे. तर बिहारमध्ये बिहाता येथे विमानतळ बांधला जाणार आहे. त्यासाठी १४१३ कोटी रुपये खर्च केले जातील. या विमानतळावर ए/३२१, बी-७३७-८००, ए-३२० जातीची विमाने तेथे उतरू शकतील.